- मधुकर नेराळे यांना जीवनगौरव पुरस्कार; वाशीत ढोलकी फड तमाशा महोत्सवाचे आयोजन
नवी मुंबई : तमाशा हा आपल्या मातीतील कलाविष्कार आहे. जुन्या काळात या कलेकडे सरकारचे दुर्लक्ष झाले. मात्र आता या चुका दुरुस्त करण्यात येणार असून तमाशा सारख्या लोककलेला राजप्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम सरकार करेल, अशी शाश्वती सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी दिली.वाशी येथे आयोजित तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार सोहळ््यांतर्गत ज्येष्ठ तमाशा कलावंत, शाहीर मधुकर नेराळे यांना सन्मानित करण्यात आले. या सोहळ््यात ते बोलत होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने, राज्य ढोलकी फड तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कलाकारांच्या आर्थिक सुरक्षेची मागणी या वेळी करण्यात आली. शुक्रवारी महोत्सवाचा समारोप झाला.राज्य ढोलकी फड तमाशा महोत्सव २०१८ अंतर्गत पाच दिवस लोकनाट्य तमाशा मंडळाच्या वतीने कार्यक्रम सादर करण्यात आले. ज्येष्ठ तमाशा कलावंत, शाहीर मधुकर नेराळे यांना राज्य सरकारचा ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.युवामंडळींसाठी अभ्यासक्रम तयार करातमाशा, शायरी, लोककला यांना विकासाची गरज आहे. आजची परिस्थिती वाईट असून, युवामंडळींकरिता यावर आधारित अभ्यासक्रम तयार करून तमाशा सारखी कला पुढे न्यावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ तमाशा कलावंत मधुकर नेराळे यांनी केले. शासनाने या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना सहभागी करत कला मंडळाची स्थापना करावी, अशी मागणीही नेराळे यांनी केली.- गतवर्षीच्या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी राधाबाई खोडे- नाशिककर यांची प्रमुख उपस्थिती असून, त्यांच्या हस्ते यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर जयवंत सुतार, विधानसभा आमदार मंदा म्हात्रे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, शिर्डी संस्थानचे सुरेश हावरे, नगरसेवक रवींद्र इथापे, गझलकार भीमराव पांचाळे, सांस्कृतिक कार्य संचालनालय समितीच्या लता पुणेकर, हेमसुवर्णा मिरजकर आदींची उपस्थिती होती.- मधुकर नेराळे यांच्या वडिलांचे तमाशा थिएटर असल्यामुळे वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांचा लोककलेशी संबंध आला. तमाशा ही लोककला जिवंत राहावी, म्हणून लालबागला हनुमान थिएटर हा खुला रंगमंच उभारून तमाशा आणि लोककलावंतांना तो उपलब्ध करून दिला. घुंगरूंची नजाकत आणि ढोलकी ऐकावी ती हनुमान थिएटरातच, असे रसिकांनी म्हणावे एवढी उंची या थिएटरने आणि नेराळे यांनी गाठली. थिएटरच्या माध्यमातून ‘गाढवाचं लग्न’, ‘आतून कीर्तन वरून तमाशा’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘उदे गं अंबे उदे’, ‘एक नार चार बेजार’, ‘पूनवेची रात्र’, ‘काजळी’ यासारख्या वगनाट्यांचे सादरीकरण केले. त्यांनी मुंबईसह महाराष्ट्र, गोवा व दिल्ली येथे लोककलेचे व लावणीचे यशस्वी प्रयोग केले. १९९५-९६ साली संगीत नाटक अकादमीतर्फे हिमाचल प्रदेशात नेराळे यांनी लोककलेचे कार्यक्र म केले. १९९० ते १९९६पर्यंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या तमाशा प्रशिक्षण शिबिराचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर या कार्यालयाच्या समितीवर १९९३ ते २००१ या कालावधीत सदस्य म्हणून, तर राज्य शासनाच्या वृद्ध कलावंत मानधन समितीवर अनेक वर्षे सदस्य म्हणून काम केले आहे.