- नामदेव मोरेनवी मुंबई : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडूनच जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात वापर झालेले वैद्यकीय साहित्य कचराकुंडीत टाकले जात आहे. बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये खासगी व महापालिका रुग्णालये व छोट्या क्लिनीकची संख्या २२०० पेक्षा जास्त आहे. या सर्व रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. नियम तोडणाºया रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचा अधिकारही पालिकेला आहे. पालिका प्रशासन रुग्णालयांची तपासणी करून नियम तोडणाºयांवर कारवाई करत असते. यापूर्वी अनेकांना नोंदणी रद्द करण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत. नेरुळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयावर गुन्हाही दाखल केला होता. खासगी रुग्णालयांना नियम पाळण्याची सक्ती करणारी पालिका स्वत: मात्र नियमांचे उल्लंघन करत आहेत. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये वैद्यकीय कचºयाची नियमाप्रमाणे विल्हेवाट लावण्याऐवजी तो डम्पिंंग ग्राउंडवर टाकला जात आहे. सलाइनच्या बॉटल, हातमोजे, सुई व इतर कचरा रुग्णालयाच्या मागील बाजूला असलेल्या कचराकुंडीत टाकला जात आहे. वास्तविक जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम २०१६ प्रमाणे सुया व इतर कचरा विशिष्ट डब्यात साठवून तो नियुक्त केलेल्या एजन्सीकडे देणे आवश्यक आहे. कोणता कचरा कोणत्या रंगाच्या डब्यात टाकायचा, या विषयी स्पष्ट सूचना आहेत. महापालिका प्रशासनाने कचरा हाताळणाºया कर्मचाºयांना त्याविषयी प्रशिक्षणही दिले आहे; परंतु त्यानंतरही कचराकुंडीत वैद्यकीय साहित्य टाकले जात आहे.वैद्यकीय कचºयाची नियमाप्रमाणे विल्हेवाट लावली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम मानवी आरोग्यावर होण्याची शक्यता असते. महापालिका रुग्णालयातील कचरा विषयक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे काही दक्ष नागरिकांनी ‘लोकमत’च्या निदर्शनास आणून दिले. शनिवारी प्रत्यक्षात रुग्णालय आवारामध्ये जाऊन पाहणी केली असता कर्मचारी सुई, सलाइनच्या बॉटल, हातमोजे कचराकुंडीत टाकत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन संबंधित कर्मचाºयांना अशा प्रकारची हालगर्जी होऊ नये, अशा सूचना दिल्या. वास्तविक महापालिकेने शहरातील इतर रुग्णालयही नियमांचे पालन करत आहेत का, यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे; पण प्रत्यक्षात पालिका रुग्णालयातच नियमांचे पालन होत नसल्याचे पाहून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, या प्रकाराला जबाबदार असणाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.डबे किंवा पिशव्यांचा वापरनियमाप्रमाणे विल्हेवाटयोग्य वस्तूंपासून निर्माण झालेला कचरा, नळ्या, बाटल्या, सिरिंज, सुया व इतर कचरा लाल रंगाच्या बिगर क्लोरिनयुक्त पिशव्या किंवा डब्यात ठेवणे आवश्यक आहे. या साहित्याचे बारीक तुकडे करून त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. प्रक्रिया केलेला कचरा ऊर्जा पुन:प्राप्तीसाठी नोंदणीकृत किंवा अधिकृत पुनश्चक्रिकारकांकडे पाठवणे आवश्यक आहे. प्लॅस्टिक कचरा कोणत्याही स्थितीमध्ये लँडफील साइटवर टाकू नये, असे नियमात स्पष्ट केले आहे.वैद्यकीय कचºयाचे दुष्परिणाम- वैद्यकीय उपचारातून निर्माण होणारा कचरा हा मानवी आणि जनावरांच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक.- विविध संसर्गजन्य रोगांची लागण होऊ शकते.- टीबी, त्वचाविकार होऊ शकतो.- श्वसनसंस्थेसंदर्भातील अनेक आजार उद्भवू शकतात.- लहान मुलांच्या हातात वैद्यकीय कचरा पडल्यास त्यांना अपाय होऊ शकतो.चौकशीची मागणीमहापालिकेच्या रुग्णालयामध्ये अनेक दिवसांपासून कचराकुंडीत सलाइन, हातमोजे, सुई व इतर कचरा टाकला जात आहे. या प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दक्ष नागरिक करू लागले आहेत.वैद्यकीय कचºयाची नियमाप्रमाणे विल्हेवाट लावली जाते. यासाठी संबंधित कर्मचाºयांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. पालिका रुग्णालयांमध्ये नियमांचे पालन केले जाते. वाशीमध्ये जर कोणी कचराकुंडीत वैद्यकीय साहित्य टाकले असल्यास त्याची माहिती घेतली जाईल.- डॉ. दयानंद कटके,वैद्यकीय आरोग्य अधिकारी,महापालिका
जैव कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन; महापालिकेच्या वाशी रुग्णालयातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 5:56 AM