सूर्यकांत वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : आचारसंहिता घोषित होऊन महिना उलटला तरी आरटीओ कार्यालयाच्या आवारात आचारसंहितेचा भंग सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्या ठिकाणी अनेक राजकीय संघटनांची कार्यालये असून त्यांनी लावलेले फलक अद्याप झाकण्यात आलेले नाही. शिवाय वाहनांवरही राजकीय पक्षांचे स्टीकर दिसत असून निवडणूक विभागाच्या भरारी पथकाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, २९ एप्रिलला होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने शहरात आचारसंहिता लागू आहे. १० मार्चला ही आचारसंहिता घोषित झाली आहे. त्यानंतर २४ तासांत शहरातील राजकीय फलक, वाहनांवरील राजकीय पदांच्या पाट्या तसेच स्टिकर हटवणे आवश्यक होते. मात्र, महिना उलटून गेला तरी आरटीओ कार्यालयाच्या आवारात आचारसंहितेचा भंग होताना दिसून येत आहे.
एपीएमसीमधील धान्य मार्केटमध्ये भाडोत्री जागेत आरटीओचे कार्यालय आहे. त्याच ठिकाणी राजकीय पक्षांच्या वाहतूक संघटनांची, तसेच एजंटची कार्यालये आहेत, यामुळे त्या ठिकाणी दररोज शेकडो नागरिकांची ये-जा सुरू असते. त्या सर्वांना नजरेस पडेल अशा ठिकाणी राजकीय संघटनांचे फलक लावलेले आहेत. मात्र, शहरात आचारसंहिता लागू असल्याने हे फलक हटवणे अथवा झाकणे आवश्यक असतानाही संबंधितांकडून त्याची खबरदारी घेण्यात आलेली नाही. त्याशिवाय आरटीओ कार्यालयात येणाºया वाहनांवरही राजकीय पक्षाच्या चिन्हांचे स्टिकर पाहायला मिळत आहेत.
संबंधित राजकीय पक्षाचा कट्टर कार्यकर्ता सिद्ध करण्यासाठी अनेकदा कार्यकर्त्यांचा आटापिटा सुरू असतो, याकरिता वाहनांच्या काचेवर पुढे अथवा मागे नेत्याचे फोटो छापणे, नंबरप्लेटवर पक्षाच्या चिन्हाचे स्टिकर लावणे, असे प्रकार सुरू असतात. तसेच पक्षात छोटे-मोठे पद असल्यास त्याची पाटी बनवून ती वाहनावर लावली जाते. मात्र, अशा राजकीय पाट्या, स्टिकर हे आचारसंहिता काळात झाकल्या जाणे आवश्यक असते. यानंतरही पोलीस अथवा निवडणूक विभागाच्या कारवाईची भीती राहिलेली नसल्याने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. सद्यस्थितीला शहरात अशा प्रकारची वाहने मोठ्या संख्येने रस्त्यांवर फिरत आहेत. त्यापैकी काही वाहने आरटीओ आवारातही उभी असल्याचे पाहायला मिळत आहे.
शहरात आचारसंहितेचा भंग होत असल्यास तक्रारीसाठी पोलिसांनी ९३७२४१९७९९ हा हेल्पलाइन नंबर सुरू केलेला आहे. तर निवडणूक विभागाने ऐरोली व बेलापूर विधानसभा क्षेत्रासाठी एकूण १६ पथके तयार केली आहेत. त्यामध्ये आठ स्थायी व आठ भरारी पथकांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ठोस कारवाई होणे अपेक्षित आहे.मागील काही महिन्यांत पालिकेतर्फे प्रत्येक नोडमध्ये पदपथांभोवती रेलिंग बसवण्याची कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. ही कामे आपल्याच मागणीनुसार अथवा निधीतून झाल्याचे दाखवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून त्यावर स्वत:ची नावे लिहिण्यात आली आहेत. तीदेखील झाकली जाणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.