आयुक्तांच्या आदेशाचा भंग, ओरियन माॅलमधील 'बिग बझार'वर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 10:54 PM2020-05-22T22:54:37+5:302020-05-22T22:55:17+5:30
पनवेल ओरियन मॉल मध्ये आज शुक्रवार असताना दुकान सुरु करण्यास परवनागी नसताना कापडाचे दुकान चालू ठेवून मनपाने ठरवून दिलेल्या नियमाचे उल्लंघन केले असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल : आयुक्तांच्या आदेशाने लाॅकडाऊन कालावधीत काही दुकाने विशिष्ट दिवशी उघडण्याची काही अटींवर परवानगी दिली होती. कोरोना चा प्रकोप कमी व्हावा यासाठी लाॅकडाऊन वाढविण्यात आलेला आहे. परंतु दैनंदिन जीवनदेखील त्यामुळे प्रभावित होत आहे. यासाठी शासनाने काही बाबतीत सवलती देण्याचा अधिकार त्या त्या स्थानिक प्राधिकाऱ्यांना दिलेला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त हे सक्षम अधिकारी आहेत. त्यानुसार एकल दुकानांना विशिष्ट दिवशी उघडण्यास परवानगी दिली होती.
परंतु याकडे दुर्लक्ष करून काही दुकानदार वैयक्तिक फायद्यासाठी कायद्याचा भंग करत आहेत. पनवेल ओरियन मॉल मध्ये आज शुक्रवार असताना दुकान सुरु करण्यास परवनागी नसताना कापडाचे दुकान चालू ठेवून मनपाने ठरवून दिलेल्या नियमाचे उल्लंघन केले असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती "ड" चे प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने सदरचे दुकान बंद करून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत जर कोणी लाॅकडाऊनच्या आदेशांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांचेवर सख्त कारवाई करण्यात येईल.अशी माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.