नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात हाेर्डिंग उभारताना जाहिरातदारांनी नगरविकास विभागाच्या होर्डिंग पॉलिसीला तिलांजली देऊन अनेक ठिकाणी नियमबाह्य होर्डिंग उभारली आहेत. यात सीआरझेड क्षेत्रात होर्डिंग असून डिजिटल होर्डिंगचा लख्ख प्रकाश रात्रभर तसाच ठेवणे, असे प्रकार शहरातील ठाणे-बेलापूर, सायन-पनवेल मार्ग, पाम बीच मार्गासह शिवाजी चौक, अरेंजा चौकासह अंतर्गत भागात दिसत आहेत. अनेक ठिकाणी नियम उल्लंघनसीआरझेड क्षेत्रात वाशीगांव, पाम बीच मार्ग, ऐरोली-मुलुंड रस्ता, पदपथांवर आणि सार्वजनिक रस्त्यांवर कोणत्याही जाहिरात फलकांना मनाई आहे. तसेच जिथे पदपथ नाही त्या रस्त्यांवर जाहिरातबाजीला मनाई असतानाही ती केली जात आहे. मैदाने, क्रीडांगणे, बगीच्यांसह दोन किंवा अधिक रस्ते एकत्र येतात, त्यांच्या पोचमार्गापासून २५ मीटरच्या आत आता होर्डिंग उभारता येत नाहीत. तरीही अनेक ठिकाणी होर्डिंग उभारले आहेत. या नियमावलीस पायदळी तुडवून शहरात आजही ठिकठिकाणी वाढदिवसाचे बॅनर, कमर्शिअल होर्डिंग झळकत आहेत.
पर्यावरणप्रेमींचाही डिजिटल होर्डिंगला विरोधशहरात ठिकठिकाणी असलेली बिलबार्डसह डिजिटल होर्डिंगची तक्रार पर्यावरणप्रेमींनी महापालिकेसह पर्यावरण विभागाकडे केली आहे. अशा होर्डिंगचा पक्ष्यांसह मानवाच्या डोळ्यांना त्रास होत असून यामुळे वाहनांचे अपघात होत असल्याचा त्यांचा आरोप नॅट कनेक्ट फाउंडेशनचे बी. एन. कुमार यांनी आपल्या तक्रारीत केला होता.