नामदेव मोरेनवी मुंबई : स्मार्ट सिटीमधील रुग्णालयांमध्येही अग्निशमन नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. २१ डिसेंबरला नेरुळमधील मनपा रुग्णालयास आयुक्त अभिजीत बांगर यांनी अचानक भेट दिली असताना, तेथील अग्निशमन उपकरणांची मुदत संपल्याचे निदर्शनास आले होते. त्याच वेळी आयुक्तांनी सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.
भंडाऱ्यामध्ये लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात आग लागून दहा मुलांचा मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईमध्ये २१६ खासगी व सहा पालिकेची रुग्णालये आहेत. यामध्ये दोन वैद्यकीय महाविद्यालय, दोन दंतवैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. अनेक रुग्णालयांमध्ये अग्निशमन नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. नेरुळमधील मीनाताई ठाकरे रुग्णालयात आयुक्तांनी भेट दिल्यानंतर, तेथील अग्निशमन उपकरणांची मुदत संपल्याचे निदर्शनास आले. शहरातील इतरही अनेक रुग्णालयांमध्ये हीच स्थिती आहे. ७० टक्के रुग्णालयांमध्ये फायर एक्झिटची सुविधाच नाही. जिथे आहे, त्या ठिकाणी इतर साहित्य ठेवले आहे. रुग्णालयात आपत्कालीन स्थितीमध्ये काय करायचे, याविषयी सूचना फलकही लावले नाहीत. पालिका रुग्णालयातही फारशी वेगळी स्थिती नाही. यामुळे आग लागल्यास रुग्णांना बाहेर काढणे अशक्य होणार आहे.
नियमांप्रमाणे प्रत्येक रुग्णालयाने दर सहा महिन्यांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून दाखला घेणे आवश्यक आहे. रुग्णालय व्यवस्थापन दाखना घेते, परंतु प्रत्यक्षात रुग्णालयामधील अनेक उपकरणे चालू नसतात. शहरात भंडाराप्रमाणे दुर्घटना होऊ नये, यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व रुग्णालयांना अग्निशमन उपकरणे तपासून घेण्याचे आदेश दिले आहेत. जे नियम पाळत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.
पंधरा दिवसापूर्वी नेरुळ रुग्णालयास भेट दिली असताना, अग्निशमन उपकरणांची मुदत संपल्याचे निदर्शनास आले होते. त्याच वेळी सर्व रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेशही दिले आहेत. - अभिजीत बांगर, आयुक्त महानगरपालिका
मेडिकल, छोट्या दवाखान्यांचेही दुर्लक्षशहरात मेडिकल व छोट्या क्लिनिकची संख्याही वाढत आहे. नियमाप्रमाणे या सर्व अस्थापनांमध्ये फायर एक्स्टिंग्युशर असणे आवश्यक आहे, परंतु शहरातील अनेक मेडिकलला जनरल स्टोअर्सचे स्वरूप आले आहे. औषधांशिवाय इतर वस्तुंचीही विक्री केली जात असून, या मधील अनेक दुकानांमध्ये अग्निसुरक्षेसाठी काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. छोट्या क्लिनिकमध्येही सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे.
अग्निशमन दलाचाही निष्काळजीपणारुग्णालयांनी प्रत्येक सहा महिन्यांनी अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे का, याची तपासणी करणे आवश्यक आहे. अग्निशमन विभागाकडून प्रमाणपत्र दिले जाते, परंतु संबंधित रुग्णालयांची काटेकोर तपासणी केली जात नाही. नियम तोडणारांवर प्रत्यक्षात कारवाई केली जात नाही. कारवाई होत नसल्यामुळे नियमांचे पालन होत नाही.