प्राची सोनवणे / नवी मुंबईमहापालिकेने २००३ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये अपंगांना स्टॉल उपलब्ध करून देण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर २००४मध्ये प्रत्यक्षात या अपंगांना स्टॉलचे वितरण करण्यात आले. मात्र, या स्टॉलधारकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे पाहायला मिळते. नियमानुसार अपंग, युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या पत्नी, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी यांना एसटीडी, पीसीओ, झेरॉक्स, फॅक्स बुथ, लॉटरी तिकीट विक्री, वृत्तपत्रे विक्री, पानबिडी स्टॉल्स, चर्मकार यांनी महापालिकेने दिलेल्या अटीनुसार विशिष्ट व्यवसाय करणे बंधनकारक आहे. मात्र, या जागेचा गैरवापर करून या ठिकाणी दुकाने थाटली आहेत. महापालिकेकडून प्रत्येक विभागांमध्ये प्रत्येकी स्टॉलकरिता ५ चौ.मी. जागा देण्यात आली असून, या जागेतच व्यवसाय करणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांशी स्टॉलधारकांनी या ठरवून दिलेल्या व्यवसायांव्यतिरिक्त इतर व्यवसाय सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते. अनेकांनी हे स्टॉल्स भाडेतत्त्वावर दिले आहेत्त. सीबीडी बस डेपो समोरील स्टॉल्सचा वापर ट्रॅव्हल एजन्सीकरिता केला जात असून, या ठिकाणी तिकिटांच्या ग्राहकांकडून पैसे उकळले जात असून असभ्य वर्तन केल्याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हादेखील नोंदविण्यात आला आहे. महापालिकेने दिलेल्या अटीनुसार अनुज्ञापत्रामध्ये नमूद केलेल्या जागेवर अनुज्ञापत्रधारकाचा मालकी हक्क, भाडेकरू किंवा अन्य कोणताही हक्क राहणार नाही. ही जागा इतर कोणासही भाड्याने, पोटभाड्याने किंवा अन्य कोणत्याही प्रकारे देता येणार नाही. असे असतानाही नियम धाब्यावर बसवून टूर अॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय थाटल्याचे चित्र पाहायला मिळते. नियमानुसार स्टॉलधारकांना ०.३ मीटर उंचीच्या नामफलकाव्यतिरिक्त इतर कोणताही जाहिरात फलक प्रदर्शित करता येणार नाही, असे असतानादेखील विविध मोबाइल कंपन्यांच्या जाहिराती, यात्रा कं पन्यांची माहिती देणारे फलक लावलेले पाहायला मिळतात. नेरुळ, सानपाडा, वाशी, बेलापूर आदी परिसरातील चर्मकारांनी या स्टॉल्सवर दुकाने थाटली असून रस्त्याची अडवणूक केल्याचे चित्र पाहायला मिळते. महापालिकेच्या वतीने जवळपास २०हून अधिक नियम व अटी लागू केल्या असून, त्यांचे पालन केले जात नसल्याचे चित्र पाहायला मिळते. अशा प्रकारे जागेचा गैरवापर करणाऱ्या व्यावसायिकांना याबाबत विचारणा केली असता, महापालिका अधिकारी तसेच पोलिसांना याविषयी माहिती आहे; पण आमच्यावर कारवाई केली जात नाही, असे निर्भयपणे सांगण्यात आले. विभागनिहाय स्टॉल्सची आकडेवारीबेलापूर (१४), नेरुळ (४६), वाशी (२८), तुर्भे (३१), कोपरखैरणे (२५), ऐरोली (२१)एकूण स्टॉल्सची संख्या : १६५
शहरातील स्टॉलधारकांकडून नियमांचे उल्लंघन
By admin | Published: May 03, 2017 6:13 AM