मतदार याद्यांमधील घोळ कायम; बोगस मतदानाला खतपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:52 AM2019-03-14T00:52:48+5:302019-03-14T00:53:05+5:30

दुबार नोंदणी वगळण्याकडे होतेय दुर्लक्ष; अर्ज करूनही दुरूस्ती नाही

Violence in voter lists continues; Bogus voting | मतदार याद्यांमधील घोळ कायम; बोगस मतदानाला खतपाणी

मतदार याद्यांमधील घोळ कायम; बोगस मतदानाला खतपाणी

Next

- सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : मतदारांकडून नावातील दुरुस्तीसाठी अर्ज करूनही मतदार याद्यांमधील घोळ अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे. यादींमध्ये छापील नावात अनेक त्रुटी असल्याने मतदारांना स्वत:चे नाव ओळखण्यासाठी कौशल्य पणाला लावावे लागत आहे. तर मयत व्यक्तीची व दुबार नोंदणी असलेली नावे वगळण्याचे अर्ज प्राप्त होऊनही ती वगळली जात नसल्याने यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून त्यानंतर पुढील वर्षभरात विधानसभा व महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मतदानासाठी सज्ज होण्याची तयारी मतदारांकडून सुरू आहे. तर निवडणूक विभागाकडून देखील नव्या मतदार नोंदणीसाठी आवाहन केले जात आहे. मात्र, वर्षानुवर्षे मतदार याद्यांमध्ये होत असलेल्या चुकांचा फटका नव्या तसेच जुन्या मतदारांना बसत आहे. मतदार याद्यांमधील नावासह पत्त्यामध्ये अनेक त्रुटी आढळत असून त्या सुधारण्यासाठी मतदारांकडून निवडणूक विभागाकडे तक्रार अर्जांचा पाऊस पाडला जात आहे. त्यानंतरही यादींमधील त्रुटी सुधारण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे मतदार यादीशी संबंधित संपूर्ण यंत्रणेच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर निवडणूक विभागाची आॅनलाइन नोंदणी व दुरुस्ती प्रक्रिया केवळ नावापुरतीच ठरत आहे. आॅनलाइन अर्ज व कागदपत्रे अपलोड केल्यानंतरही तीच कागदपत्रे प्रत्यक्षात जमा करण्यासाठी निवडणूक विभागाच्या कार्यालयात बोलवले जात आहे. परंतु एकदा कागदपत्रे जमा करूनही अर्जाची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने नागरिकांची नाव नोंदणीसह दुरुस्तीसाठी पायपीट होतच आहे. यानंतरही एखाद्याच्या नावाची नोंदणी झाल्यास छापील यादीतील त्रुटींमुळे त्यांना स्वत:चे नाव ओळखण्यासाठी कौशल्य पणाला लावावे लागत आहे. काहींच्या नावांमध्ये छापील त्रुटीमुळे अर्थाचा अनर्थ होत आहे, तर काही कुटुंबातील व्यक्तींची नावे वेगवेगळ्या यादीत विभागली गेली आहेत. यामुळे त्यांचे मतदानाचे केंद्रही बदलले गेले आहेत. मात्र, अर्ज भरून देताना त्यामध्ये रहिवासी सोसायटीचे नाव व पत्ता योग्यरीत्या लिहिलेला असतानाही, नाव नोंदणीवेळी मतदार यादीत तो बदलतो कसा, असा प्रश्न मतदारांना वर्षानुवर्षे पडत आहे. ओळखपत्रातील चुकांमुळे त्याचा वापर करताना समस्या अधिक वाढवण्यासारखे ठरत आहे.

चुकीच्या पत्त्यांमुळे कुटुंबे विभागली
मतदारांकडून अर्ज भरताना पुरेपूर खबरदारी घेतली जात असतानाही मतदानयादीत नावाचा समावेश होताना त्यांचे पत्ते बदलल्याचा प्रकार पाहायला मिळतो. या मागच्या नेमक्या कारणांबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, अशा त्रुटींमुळे एकाच कुटुंबातील व्यक्ती कागदोपत्री विभागली जात असून, शासकीय प्रक्रिये वेळी संबंधिताला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

मयत व्यक्तीही यादीत जिवंत
नेरुळ येथील सिद्धेश्वर तुकाराम वरपे यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. यानुसार मतदार यादीतून त्यांचे नाव वगळण्याचे अनेक अर्ज त्यांच्या नातेवाइकांनी केले आहेत. त्यानंतरही वर्षानुवर्षे याद्या अद्ययावत होत असतानाही त्यासोबत मयत व्यक्तींनाही मतदार यादीत जिवंत ठेवण्याचे काम संबंधित यंत्रणेकडून होत आहे.

आॅनलाइन नोंदणीची प्रक्रियाही आॅफलाइन
मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी निवडणूक विभागाने आॅनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध केलेली आहे. मात्र, संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज केल्यानंतरही चार ते पाच महिन्यांनी निवडणूक कार्यालयात प्रत्यक्ष कागदपत्रे जमा करण्याचे ईमेलद्वारे कळवले जाते. तर ती जमा केल्यानंतरही वेळेवर अर्ज निकाली निघत नसल्याने मतदारांसाठी आॅनलाइन प्रक्रियाही गैरसोयीची ठरत आहे.

लोकप्रतिनिधींच्या शिफारसींनाच प्राधान्य
मतदारयादीत नावनोंदणीसाठी प्रत्यक्ष अर्ज करूनही अनेकदा नागरिकांना अपयश येते. मात्र, लोकप्रतिनिधी अथवा राजकीय पदाधिकाऱ्यामार्फत ही प्रक्रिया केल्यास विनाअडथळा नावाची नोंदणी केली जाते. यामुळे मतदार नोंदणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी लोकप्रतिनिधींच्याच इशाऱ्यावर काम करतात का? असा प्रश्नही निर्माण होत आहे.

मागील काही वर्षांत अनेकांची शहरांतर्गत वास्तव्याची ठिकाणे बदलली आहेत. त्यापैकी अनेकांनी वास्तव्याच्या पूर्वीच्या ठिकाणची मतदार नोंदणी वगळून नव्या नोंदणीसाठी अर्ज केलेले आहेत. मात्र, वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही त्यांच्या अर्जाची दखल घेतली गेली नाही. तर मागील दहा वर्षांत कोपरखैरणेतील माथाडी कामगारांची अनेक कुटुंबे घणसोलीला स्थलांतरित झाली आहेत. त्यांच्याकडूनही जुनी नावे वगळण्याचे करण्यात आलेले अर्ज निवडणूक विभागाकडे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. यामुळे शहरात दुबार मतदारांच्या नोंदणीची संख्या वाढतच चालली असून, शिवाय अशा ठिकाणी बोगस मतदान होत असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Violence in voter lists continues; Bogus voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.