‘डीएचएलएफ’ वाधवान बंधूंना व्हीआयपी वागणूक; कारागृहात थाटच वेगळा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 11:18 AM2023-08-30T11:18:19+5:302023-08-30T11:18:36+5:30
एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान दोन्ही भावंडे वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली जे.जे. हॉस्पिटल आणि जे.जे. रुग्णालयाच्या आवारात मौजमजा करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
पनवेल : ३४ हजार ६१४ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी असलेले ‘डीएचएलएफ’चे माजी प्रमोटर धीरज वाधवान आणि कपिल वाधवान यांचा तळोजा कारागृहात राजेशाही थाट असल्याचे समोर आले आहे. एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान दोन्ही भावंडे वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली जे.जे. हॉस्पिटल आणि जे.जे. रुग्णालयाच्या आवारात मौजमजा करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
मागील काही वर्षांपासून दोघेजण तळोजा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. ऑगस्ट महिन्यात अनुक्रमे ७ आणि ९ ऑगस्टदरम्यान दोन्ही आरोपी तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. मात्र, मेडिकल तपासणीसाठी गेलेल्या या आरोपींना घरचे जेवण, मोबाइल, लॅपटॉप सेवा पुरविण्यात येत असल्याचे फोटो समोर आले आहेत. १७ बँकांची फसवणूक करणाऱ्या या आरोपींना व्हीआयपी सेवा पुरविली जात असल्याचा आरोप कारागृह प्रशासनावर केला जात आहे. महिनाभरात वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली या आरोपींना कित्येक वेळा या ठिकाणी नेले जात आहे.
तळोजा कारागृहात ४ हजारांपेक्षा जास्त कैदी आहेत. मात्र, मोजक्याच व्हीआयपी कैद्यांचे लाड पुरविले जात असल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेबाबत माहिती घेण्यासाठी तळोजा कारागृहाचे अधीक्षक दत्तात्रेय गावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.