व्हायरल! विनोद तावडेंना आपल्या गाडीत बसू द्या, मनसेचं चक्क राजनाथसिंहांनाच पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 13:38 IST2019-04-17T13:32:59+5:302019-04-17T13:38:34+5:30
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्यात भाजपा आणि मोदींविरुद्ध सूर आळवण्यात येत आहे.

व्हायरल! विनोद तावडेंना आपल्या गाडीत बसू द्या, मनसेचं चक्क राजनाथसिंहांनाच पत्र
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठआकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि भाजपाविरुद्ध आपला आवाज उठवला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज यांच्यावर टीका करणाऱ्या नेत्यांचा मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून समाचार घेण्यात येत आहे. त्यातच, नवी मुंबईतील मनसेच्या अध्यक्षांनी चक्क राजनाथसिंह यांना पत्र लिहून विनोद तावडेंना एकदा तुमच्या गाडीत बसू देण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. अर्थात, विनोद तावडेंची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न मनसेने केला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्यात भाजपा आणि मोदींविरुद्ध सूर आळवण्यात येत आहे. आतापर्यंत राज ठाकरेंच्या तीन राजकीय सभा पार पाडल्या आहेत.या सभांमधून राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर राजकीय स्ट्राईक केला. तसेच सोलापुरातील सभेत बोलताना, भाजपाने जाहिरात केलेल्या डीजिटल व्हिलेज हरिसालचा पर्दाफाश केला. या गावाती अद्यापही डीजिटल सुविधा नसल्याचे राज यांनी सांगितले. राज ठाकरेंच्या या सभेनंतर सरकारतर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी सरकार त्याकडे लक्ष देईल, असे सांगितले. मात्र, त्यासोबतच राज ठाकरेंवर टीकाही केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथून परतत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी खास चर्चा करण्यासाठी त्यांच्या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला व सोलापूरच्या एका हॉटेलमध्ये दोघांची चर्चा झाली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या टूरिंग टॉकिजची पुढची स्क्रिप्ट शरद पवार यांनी त्यांना दिली असावी, असा आरोप विनोद तावडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला. राज ठाकरे कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत हे मनसेने जाहीर करावे, असे आवाहनही तावडे यांनी केले. तावडेंच्या या टीकेनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी तावडेंना लक्ष्य केलं आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी इचलकरंजी येथील सभेत बोलताना, तावडेंना विनोदी नेता असे संबोधले. तसेच, राजनाथसिंहांचा ड्रायव्हर ज्यांना आपल्या गाडीत बसू देत नाही, त्यांनी राज ठाकरेंबद्दल बोलू नये, असेही संदीप देशपांडेंनी म्हटले. त्यानंतर, आज नवी मुंबईतील मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी चक्क गृहमंत्री राजनाथसिंह यांना पत्र लिहून विनोद तावडेंना तुमच्या गाडीत बसू देण्याची एकदा संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. मनसेचे हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आपल्या गाडीत बसण्याची एक संधी द्या....मनसेचे राजनाथ सिंगांना पत्र.. @TawdeVinod#VinodTawde#RajnathSinghpic.twitter.com/XFqt0oVxhh
— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) April 17, 2019