नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : राज्यातील नाट्यगृहांमधील गैरसोयींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाट्यगृहांच्या दुरावस्थेविषयी कलाकारांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या विष्णूदास भावे नाट्यगृहाचे मात्र कलाकारांकडून कौतुक होत आहे. येथील स्वच्छता, वातानुकूलीत यंत्रणा व सर्वच सुविधा सर्वोत्तम असून राज्यातील इतर नाट्यगृह चालकांनी व नगरपालिका, महानगरपालिका प्रशासनाने नवी मुंबईचे अनुकरण करावे असे आवाहनही कलाकारांनी केले आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहाविषयीचा व्हिडीओ समाज माध्यमावर टाकला असून तो सर्वत्र व्हायरल होऊ लागला आहे. राज्यातील पुणेसह अनेक शहरांमधील नाट्यगृहांची दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी स्वच्छता नाही. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. वातानुकूलीत यंत्रणा चालत नाही अशा स्थितीमध्ये विष्णूदास भावे नाट्यगृहाचे वेगळेपण या व्हिडीओमधून सांगितले आहे. नाट्यगृहामधील स्वच्छतेसाठी व्हॅक्यूम क्लीनरचा वापर केला जात आहे. स्वच्छतेमुळे नाट्यगृहात डास आढळत नाहीत. वातानुकूलीत यंत्रणा अद्ययावत आहे. मेकअपरुममध्ये स्क्रिन बसविण्यात आला आहे. यामुळे स्टेजवर काय चालले आहे हे कलाकारांना आतमध्ये बसून पाहता येते व त्याप्रमाणे तयारी करणे सहज शक्य असल्याचे कलाकारांनी सांगितले आहे.
अभिनेत्री मुक्ता बर्वे, रोहीणी हट्टंगडी, कादंबरी कदम यांच्यासह अनेक कलाकारांनी नाट्यगृहामधील सुविधांविषयी समाधान व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेने ज्या प्रमाणे नाट्यगृहाचे व्यवस्थापन सांभाळले आहे, येथे अत्याधुनीक सुविधा पुरविल्या आहेत, त्याचे अनुकरण राज्यभर होणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या विष्णूदास भावे नाट्यगृहात स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले आहे. वातानुकूलीत यंत्रणा व इतर सुविधाही दर्जेदार आहेत. राज्यातील इतर नाट्यगृह व्यवस्थापनांनी याचे अनुकरण केले पाहिजे. -मुक्ता बर्वे, अभिनेत्री
राज्यातील इतर नाट्यगृह व नवी मुंबईमधील विष्णूदास भावे नाट्यगृह यामध्ये खूप फरक आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने सर्वोत्तम सुविधा पुरविल्या असल्यामुळे येथे प्रयोग करताना वेगळा आनंद मिळत असतो. -रोहीणी हट्टंगडी, ज्येष्ठ अभिनेत्री