जागतिक बँकेच्या प्रतिनिधीची मुंबई बाजार समितीला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:37 AM2018-12-13T00:37:24+5:302018-12-13T00:37:53+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी एपीएमसीमधील भाजीपाला, फळे मार्केटमध्ये चालणारे कामकाज, व्यापार, आवक, जावक आदीची माहिती घेण्यासाठी बुधवार, १२ डिसेंबर रोजी जागतिक बँकेचे वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि संपर्क अधिकारी जेम्स टेफट यांनी भेट दिली.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी एपीएमसीमधील भाजीपाला, फळे मार्केटमध्ये चालणारे कामकाज, व्यापार, आवक, जावक आदीची माहिती घेण्यासाठी बुधवार, १२ डिसेंबर रोजी जागतिक बँकेचे वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि संपर्क अधिकारी जेम्स टेफट यांनी भेट दिली. मार्केटमध्ये प्रत्यक्षात चालणारे कामकाज, सुविधा या बाबत त्यांनी आढावा घेतला.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील आवक-जावक, शेतमालाचा व्यापार, शेतमालाची चढ-उतार, स्वच्छता, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराज्यीय व्यापार, सरकारी धोरण, सरकारी फंड, इनाम, राष्ट्रीय कृषी बाजार, नवीन कायदा आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची गरज आदीची माहिती घेतली. तसेच इनाम लॅब.ची व लिलाव सभागृहाची पाहणी केली. मार्केटमध्ये जमा होणाऱ्या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी कचºयापासून वीजनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याबाबतही माहिती देण्यात आली. मार्केटमध्ये चालणारे सर्व कामकाज स्वयंचलित आणि यांत्रिक मशिनच्या साहाय्याने करून माथाडी कामगारांना त्याचे ज्ञान देऊन त्यांना कुशल माथाडी म्हणून परिवर्तित करणे काळानुरूप आवश्यक असून, तसे केल्यास त्यांचा रोजगारही कायम राहणार असल्याचे टेफट यांनी सांगितले. प्रशासक मंडळाचे प्रमुख सतीश सोनी, सचिव अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती देण्यात आली, या वेळी सहसचिव अविनाश देशपांडे, अशोक गाडे, मार्केटिंग बोर्ड प्रतिनिधी भास्कर पाटील, गायकवाड, उपअभियंता मेहबूब बेपारी, सहायक सचिव दौडकर, गोविंद घोडे, उपसचिव के. आर. पवार आदी उपस्थित होते.