क्रूझमधून करा किल्ल्यांची सफर, मेरिटाईम बोर्डाचा पुढाकार; स्थानिक संस्कृतीला मिळणार प्रोत्साहन
By नारायण जाधव | Published: March 24, 2023 11:32 AM2023-03-24T11:32:55+5:302023-03-24T11:33:29+5:30
नवी मुंबई : राज्यातील ७२० किमीच्या सागरी किनारपट्टीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष देणारे अनेक गडकोट किल्ले आहेत. ...
नवी मुंबई : राज्यातील ७२० किमीच्या सागरी किनारपट्टीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष देणारे अनेक गडकोट किल्ले आहेत. या गडकोट किल्ल्यांच्या नव्या पिढीला ओळख व्हावी, शिवरायांचा इतिहास त्यांना ज्ञात व्हावा, यासाठी राज्य सरकारने मेरिटाईम बोर्डाच्या सहकार्याने आता समुद्र सफारीच्या माध्यमातून किल्ले पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात मुंबई ते मुरुड अशी क्रूझ सेवा सुरू करण्यात येणार आहे.
या क्रूझ सेवेच्या माध्यातून देशी-विदेशी पर्यटकांना मुंबईहून सकाळी सहा वाजता मुरुडला नेऊन रात्री दहा वाजता परत मुंबईला सोडण्यात येणार आहे. या एकदिवसीय पर्यटन क्रूझ सेवेद्वारे पर्यटकांना दिघी पोर्ट, मुरुड-जंजिरा सागरी किल्ला, मुरुड बीच, पद्मदुर्ग किल्ला, खोखारी येथील सिद्धी सुरुल खानची कबर यांची सफर घडविण्यात येणार आहे. सध्या याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे मेरिटाईम बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले.
क्रूझ सेवेचा उद्देश
या किल्ले पर्यटनाद्वारे पर्यटकांना राज्यातील स्थानिक संस्कृती, लोककला, खाद्य संस्कृतीची ओळख व्हावी, सागर किनाऱ्यांचे सौंदर्य न्याहाळता यावे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, हा उद्देश मुंबई ते मुरुड क्रूझ सेवा सुरू करण्यामागे आहे.
क्रूझमध्ये पंचतारांकित सुविधा असल्याने देश-विदेशातील पर्यटक त्याकडे आकर्षित होऊन सरकारचा किल्ले पर्यटनाचा उद्देश सफल होईल, असा मेरिटाईम बोर्डास विश्वास आहे.
असे असेल एकदिवसीय पर्यटन
सकाळी सहा वाजता क्रूझ मुंबईहून सुटणार आहे. ती साडेनऊ वाजता दिघी बंदरावर पोहचेल. तेथून फेरीद्वारे दहा ते पावणेअकरा यादरम्यान मुरुड-जंजिरा किल्ल्यावर येईल. किल्ला पाहून झाल्यानंतर फेरी आणि रस्ते मार्गाने खोखारी कबरीच्या स्थळी येईल.
११.१० ते १२.१५ अशी वेळ यासाठी असेल. यानंतर १२.३० ते १.३० अशी जेवणाची वेळ राखून ठेवण्यात आली आहे.
जेवण झाल्यानंतर दुपारी दोन ते साडेतीन वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील पद्मदुर्ग किल्ला पाहण्यासाठी फेरीद्वारे नेण्यात येईल.
३.४५ ते ५.४५ मुरुड बीचवर थांबून तेथून परतीचा प्रवास सुरू होणार आहे. त्यासाठी ५.४५ ते ६.३० या वेळेत दिघी बंदरात फेरीद्वारे सोडण्यात येणार आहे. साडेसहा ते रात्री दहा वाजता मुंबई बंदरांत परत सोडले जाईल.
भाईंदर ते बांद्रा जलवाहतूक
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील भाईंदर ते बांद्रा या विभागासाठी जलवाहतूक सेवासुद्धा मेरिटाईम बोर्ड सुरू करणार आहे. सध्या दोन उपनगरांना जोडणाऱ्या लोकल आणि रस्ते मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. हे लक्षात घेऊन आता जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. यात वेळ, पैसा, इंधनासह प्रदूषणाची मोठी बचत होणार आहे.