कुलगुरूंची जेएसएम कॉलेजला भेट
By admin | Published: October 16, 2015 02:18 AM2015-10-16T02:18:44+5:302015-10-16T02:18:44+5:30
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी गुरुवारी येथील जेएसएम महाविद्यालयास भेट देऊन महाविद्यालयात आयोजित प्राध्यापकांच्या सेवाअंतर्गत बढती प्रक्रियेच्या मुलाखतींचे निरीक्षण केले
अलिबाग : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी गुरुवारी येथील जेएसएम महाविद्यालयास भेट देऊन महाविद्यालयात आयोजित प्राध्यापकांच्या सेवाअंतर्गत बढती प्रक्रियेच्या मुलाखतींचे निरीक्षण केले. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी महाविद्यालयात कुलगुरूंचे स्वागत केले.
यावेळी सेक्रेटरी अजित शाह, जेएसएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल क. पाटील, अॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या अॅड. रेश्मा पाटील, जेएसएमचे उपप्राचार्य डॉ. उदय जोशी, प्रा. अविनाश ओक, प्रा. सरेंद्र दातार व इतर प्राध्यापकवर्ग उपस्थित होता.
यावेळी कुलगुरू डॉ. देशमुख यांनी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय दत्ता पाटील यांच्याबरोबर भविष्यातील विद्यापीठाच्या योजना व कोकणातील महाविद्यालयांचा विकास याविषयी चर्चा केली. मुंबई विद्यापीठातील सर्व विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची व रायगड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची सभा पुढील महिन्यात अलिबाग महाविद्यालयात घेण्याचा मनोदय या वेळी कुलगुरूंनी व्यक्त केला.
सेवाअंतर्गत बढती प्रक्रियेच्या निमित्ताने महाविद्यालयास पुणे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी भेट दिली. (विशेष प्रतिनिधी)