नवी मुंबई : मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजीत कोळी आगरी महोत्सवातून भुमीपुत्रांच्या कला व संस्कृतीचे दर्शन शहरवासीयांना घडविले. ऐरोलीमध्ये आयोजीत महोत्सवाला हजारो शहरवासीयांनी गर्दी केली होती. यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवरांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध भाषा व संस्कृती असलेले नागरीक नवी मुंबईमध्ये वास्तव्यास आले आहेत. सर्वांनी आपली संस्कृती व कला जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. याच प्रमाणे या शहराचे खरे शिल्पकार येथील भुमीपुत्रांनीही कला व संस्कृतीचे प्राणपणाने जतन केले आहे. भुमीपुत्रांची कला, संस्कृती, खाद्यसंस्कृती याचे दर्शन घडविणारा उत्सव मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानने ऐरोलीत आयोजीत केला होता. कोळी आगरी महोत्सवाला शहरवासीयांनी प्रचंड गर्दी केली होती. रविवारी एकाच दिवशी तब्बल २५ हजार पेक्षा जास्त शहरवासीयांनी उत्सवाला भेट दिली. रविवारी प्रसिद्ध गायक संतोष चौधरी उर्फ दादुस याने उपस्थितांना कोळी गीतांच्या तालावर ठेका धरण्यास भाग पाडले. त्यांनी व कलाकारांनी सादर केलेल्या गीतांना रसीकांनी भरभरून दाद दिली. यावेळी नवी मुंबईच्या जडणघडीमध्ये महत्वाची भुमिका बजावणाऱ्या मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रेवेंद्र पाटील यांनी उत्सवामागील भुमिका स्पष्ट केली. नवी मुंबईच्या विकासामध्ये वाटा उचलणाऱ्या नागरीकांचा गौरव करून त्यांच्या कार्याचा उचित सन्मान करावा व त्यांच्या कार्यापासून इतरांनाही प्रेरणा मिळेल व मिळावी म्हणून हा गौरव करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
भुमीपुत्रांच्या संस्कृतीचे शहरवासीयांना दर्शन
By admin | Published: January 24, 2017 6:02 AM