विठूचा गजर हरी नामाचा... झेंडा रोविला
By Admin | Published: July 5, 2017 06:36 AM2017-07-05T06:36:35+5:302017-07-05T06:36:35+5:30
‘विठूचा गजर हरी नामाचा... झेंडा रोविला...’ अशा टाळ-मृदुंगासहच्या गजरात जिल्ह्यातील २१८ विठ्ठल मंदिरांत त्या त्या परिसरातील
विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : ‘विठूचा गजर हरी नामाचा... झेंडा रोविला...’ अशा टाळ-मृदुंगासहच्या गजरात जिल्ह्यातील २१८ विठ्ठल मंदिरांत त्या त्या परिसरातील शाळांमधील विद्यार्थी वारकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या पोहोचणाऱ्या दिंड्यांमुळे सर्वत्र सारे वातावरण अत्यंत भक्तिमय बनून गेले होते. मंगळवारी विविध मंदिरांमध्ये पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.
अलिबाग शहराचे उपनगर असलेल्या वरसोली येथील प्राचीन आंग्रेकालीन विठ्ठल-रखुमाई मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. वरसोली कोळीवाडा, वरसोली येथील आयईएस शाळा, पीएनपी स्कूल यांच्या विद्यार्थी दिंड्यांसह अलिबाग तालुक्यातील विविध कोळीवाड्यांतील दिंड्या दर्शनाकरिता मंदिरात आल्या होत्या.
मंदिरात पहाटेपासूनच विविध भजन मंडळांनी आपली भजनसेवा रु जू केली. मंदिर विश्वस्त व संयोजन समितीच्या वतीनेदेखील भाविकांना दर्शनात कोणतीही असुविधा होऊ नये, याकरिता चांगले नियोजन केले होते. पावसापासून संरक्षण करण्याकरिता तात्पुरत्या शेडची उभारणी करण्यात आली होती. प्रसादाचीही व्यवस्था ठेवण्यात आली होती.
भारु ड गायले
कर्जत : आषाढी एकादशीनिमित्त कर्जतमधील अभिनव ज्ञानमंदिर संस्थेच्या शिशुमंदिर शाळेने दिंडीचे आयोजन केले होते. या दिंडीत आजच्या काळात वाढत चाललेले जंक फूडचा वापर कसा घातक आहे, हे समजावून देणारे भारु ड समृद्धी बोराडे हिने सादर केले. हे भारु ड शाळेच्या मुख्याध्यापिका उमा डोंगरे यांनी रचले होते. या दिंडीत विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
तोरणा शाळेचा दिंडी सोहळा
नागोठणे : येथील तोरणा इंग्लिश मीडियम शाळेत आषाढी एकादशी -निमित्ताने विद्यार्थ्यांची वारकऱ्याच्या वेशातील दिंडी शहरात फिरविण्यात आली. दिंडीत संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे, संचालिका प्रणिता मोरे, मीना मोरे आदींसह पालक सहभागी झाले होते.
विठूनामाच्या गजराने
दुमदुमले पाली शहर
पाली : सुधागड तालुक्यातील वावलोली आदिवासी आश्रमशाळेने आषाढी एकादशीनिमित्त परंपरेनुसार पालखी सोहळा व पायी दिंडी श्रीराम मंदिर ते उन्हेरेकुंडापर्यंत काढली होती. विठ्ठलाच्या नामघोषात वारकरी, विठूनामाच्या गजरात पाली नगरी दुमदुमली होती. गेल्या ६१ वर्षांची ही परंपरा वावलोली आदिवासी आश्रमशाळेने जपली आहे. या दिंडीसाठी कुलाबा आदिवासी विकास संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लिमये आदी उपस्थित होते.
दर्शनासाठी गर्दी
आगरदांडा : मुरु ड तालुक्यातील पंचक्र ोशीतील जुनीपेठ येथे असणारे विठ्ठल-रखुमाई, काळभैरव मंदिर सुमारे १५० वर्षांपेक्षा जास्त असणारे फार प्राचीन मंदिर आहे. मुरु ड जुनीपेठ येथे एकमेव विठ्ठल मंदिर असल्याने भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती.
आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आणि वद्य पक्षातील एकादशीला कामिका असे म्हटले जाते. वर्षाभरातील २४ एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व असल्याने भक्त पंढरपूरला किंवा परिसरातील विठ्ठल मंदिरात जाऊन नतमस्तक होतात.
आषाढ एकादशीला प्रात:स्नान करून तुलसी वाहून विष्णूपूजन करण्यात येते. या पूजेचा मान-दिलीप जामकर व त्यांच्या पत्नी दीपाली जामकर यांना मिळाला. दिवसभर धार्मिक कार्यक्रम झाले.
माथेरान झाले विठ्ठलमय
माथेरान : येथे १ ते ७ जुलैपर्यंत वृक्षारोपण सप्ताह सुरू असून आषाढी एकादशीच्या अनुषंगाने येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी, तसेच अंगणवाडीतील बालगोपाळांनी सुद्धा सकाळी ९ वाजता श्रीराम चौकातून गावातील महत्त्वाच्या भागांतून थेट पंचवटीनगर येथील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल-रखुमाई मंदिरापर्यंत ही वृक्षदिंडी काढली. या वेळी अभंग, भजने आणि विठूमाउलींचा जयघोष करून संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता.
विद्यार्थी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देणारे फलक हातात घेऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत होते. विठूमाउलीच्या पालखीत किसन साबळे यांनी तुकारामाची वेशभूषा केली होती. बाल गणेश भजनी मंडळाने भजन या दिंडीतून केले. या वेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, मुख्याधिकारी डॉ. सागर घोलप, नगरसेवक शिवाजी शिंदे, नरेश काळे, शकील पटेल आदींसह उपस्थित होते.
विद्यार्थी झाले वारकरी
मोहोपाडा : रसायनी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी पायी दिंडी काढून अनेकांचे लक्ष वेधून घेतले. या वेळी वारकरी ज्या भूमिकेतून पंढरपूरला जात असतो, तशीच वस्तुस्थिती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निर्माण केली होती. मुखामध्ये हरीचे नाम आणि टाळ मृदुंगाच्या गजरात ही दिंडी मोठ्या आनंदाने परिसरात काढण्यात आली.
दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची विठूरायाबद्दल विश्वास आणि श्रद्धा पाहून जमलेले नागरिक थक्क झाले. विविध वेशभूषा आणि डोक्यावरती तुळस, मस्तकी पांडुरंगाचा बुक्का लावून विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली होती. त्यांच्या विचारांची संकल्पना आणि या भगवंताबद्दल असलेली श्रद्धा जे मोठ्या व्यक्तींना जमणार नाही ते सहज या मुलांनी करून दाखविले. पंढरपूरला जाऊ शकलो नसलो, तरी नामाच्या उच्चाराने आणि वारकऱ्यांसारखी दिंडी काढून मनाला समाधान या विद्यार्थ्यांना मिळत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
विठ्ठल-रखुमाई मंदिराला यात्रेचे स्वरूप
कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील पेझारी येथे विठ्ठल-रखुमाईच्या मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यात आला. पंढरपूर येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी मोठ्या संख्येने जाऊन दर्शन घेतात. त्याचप्रमाणे गावागावांतील जेथे जेथे विठ्ठल-रखुमाईची मंदिरे आहेत, त्या ठिकाणी या दिवशी यात्रेचे स्वरूप असते. पेझारी गावामध्ये भैरोबा देवाच्या मंदिराच्या शेजारी मागील ४० वर्षांपूर्वी गावातील महादेव म्हात्रे यांनी विठ्ठल-रखुमाई देवाचे मंदिर बांधले. मंगळवारी आषाढी एकादशीच्या दिवशी उत्सवाच्या दिवशी गावातील भजनमंडळाकडून भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दर्शनासाठी या पंचक्रोशीतील भक्तगणांनी गर्दी केली होती.
टाळ -मृदुंगाच्या गजरात चिमुकल्यांची दिंडी
आगरदांडा : एकात्मिक बालविकास अंगणवाडी ३३ लक्ष्मीखार या शाळेतील चिमुकल्यांनी आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक वेशभूषा परिधान करून सावळ्या विठूरायाचा गजर करत डोक्यावर तुळसी वृंदावन, हातात भगवे झेंडे घेत, टाळ-मृदुंगाचा गजर ज्ञानोबा-तुकाराम आणि हरिनामाचा जयघोष करीत, मुरु ड-जुनीपेठ विठ्ठल-रखुमाई मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली. या वेळी अंगणवाडी सेविका आरती शेडगे, मदतनीस संगीता म्हात्रे, कमलेश साळी व चिमुकले विद्यार्थी व नागरिक दिंडी सोहळ्यात सहभागी झाले. ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले. या वेळी अंगणसेविका आरती शेडगे यांनी दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी विद्यार्थ्यांची वेशभूषा करून दिंडी काढण्यात येते, असे सांगितले.
वृक्षदिंडीत सामाजिक संदेश
बिरवाडी : ‘चल रे गड्या, चल रे गड्या, दिंडी निघाली पंढरपुरा...’ असे म्हणत, वारकरी हसत हसत पंढरपुराची वाट धरतात. त्याचप्रमाणे कोकण विकास प्रबोधिनी संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूल, चोचिंदेमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापिका कुमुदिनी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी व वारकरी दिंडी काढली. चोचिंदे गावातील विठ्ठल मंदिरापर्यंत ही दिंडी काढण्यात आली. वारकरी वेशातील विद्यार्थ्यांनी हाती तुळशी घेऊन नववारी साडी नेसून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा सामाजिक संदेश दिला.