१५ हजार महिला बचतगटांना व्यावसायिक प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 02:15 AM2017-11-08T02:15:42+5:302017-11-08T02:15:42+5:30
महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंसिध्द करण्यासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये १५ हजार महिला बचतगट स्थापन करण्यात आले आहेत
जयंत धुळप
अलिबाग : महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंसिध्द करण्यासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये १५ हजार महिला बचतगट स्थापन करण्यात आले आहेत. या बचतगटांतील महिलांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत असून, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी दिली आहे. रविवारी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन बँकेच्या संचालिका प्रीता चौलकर यांच्या हस्ते तर नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुधाकर रघतवान यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, त्यावेळी नाईक बोलत होते.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महिला आर्थिक विकासाकरिता कटिबद्ध असून बँकेच्या माध्यमातून या सर्व महिलांचा आर्थिक विकास होण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महिला बचतगटांसाठी सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. नाबार्डच्या सहकार्यातून विशेष प्रशिक्षण कार्यक्र म संपूर्ण जिल्ह्यात आयोजित केले जातात. त्याचीच सुरु वात अलिबाग तालुक्यातील प्रशिक्षण कार्यक्र माने बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये करण्यात आली.
या प्रशिक्षणानंतर या महिलांना व्यवसाय करण्यासाठी अत्यल्प व्याजाने कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे नाईक यांनी पुढे सांगितले.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्थापन केलेले १५ हजारपेक्षा अधिक बचतगट प्रत्यक्ष कार्यरत असून ६ हजारपेक्षा अधिक बचतगटांना रायगड जिल्हा फेडरेशनच्या माध्यमातून संघटित करण्यात आले आहे. रायगड जिल्हा फेडरेशनच्या मदतीने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बचतगटांसाठी विविध विषयांचे प्रशिक्षण आयोजित करीत असते. भविष्यामध्ये महिलांना स्वत:चे उद्योग सुरु करण्यात मदत व्हावी याकरिता बँकेने एक महिना कालावधीचे शिवणक्लास तसेच संगणक विषयांचे विशेष प्रशिक्षण निश्चित केले आहे. या कार्यक्र मात मुख्य विषयांच्या समवेत मार्केटिंग, आर्थिक नियोजन, बँकिंग व्यवहार विषयांवर सुद्धा प्रशिक्षण दिले जाणार आहे. बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची ही संकल्पना असून यांनीच स्वत: असे प्रशिक्षण कार्यक्र म जास्तीत जास्त बचतगटातील महिलांसाठी आयोजित करण्यास सांगितल्याची माहिती नाईक यांनी पुढे दिली.