कोकण शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर
By नामदेव मोरे | Published: September 30, 2022 07:48 PM2022-09-30T19:48:02+5:302022-09-30T19:48:43+5:30
अर्ज दाखल करण्यासाठी 82 कार्यालये, 82 निवडणूक अधिकारी
नवी मुंबई: कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याकरिता दि. 1 ऑक्टोबर 2022 ते 30 डिसेंबर 2022 या कालावधीत कार्यक्रम राबविला जाणार आहे. कोकण विभागात अर्ज दाखल करण्यासाठी एकूण 82 कार्यालये निश्चित करण्यात आली असून 82 निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. विभागात जिल्हानिहाय परनिर्देशित 76 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) मनोज रानडे यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाकडून कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी प्राप्त झालेल्या कार्यक्रामाच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी कोकण भवन इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, प्र. तहसिलदार (सामान्य प्रशासन) माधूरी डोंगरे आणि मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
पत्रकारांना माहिती देताना उपायुक्त रानडे म्हणाले की, भारत निवडणूक अयोगाकडून कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम 1 ऑक्टोबर 2022 ते 30 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येत असून हा कार्यक्रम पुढील प्रमाणे विविध टप्प्यांमध्ये राबविला जाणार आहे. 1 ऑक्टोबर शनिवार रोजी मतदार नोंदणी नियमानुसार जाहीर सूचना प्रसिध्द करण्यात येईल. दि. 15 ऑक्टोबर शनिवार रोजी वर्तमानपत्रातील सूचनेची पुर्नप्रसिध्दी करण्यात येईल. 25 ऑक्टोबर मंगळवार रोजी वर्तमानपत्रातील सूचनेची दूसरी पुर्नप्रसिध्दी करण्यात येईल. 7 नेव्हेंबर सोमवार पर्यंत नमुना क्र. 18 किंवा 19 व्दारे दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. 19 नोव्हेंबर शनिवार रोजी मतदार याद्यांची छपाई करण्यात येईल. 23 नोव्हेंबर बुधवार रोजी मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येतील. 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रसिध्द झालेल्या मतदार याद्यांवरील दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. 25 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी छपाई करण्यात येईल. दि. 30 डिसेंबर 2022 शुक्रवार रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कोकण विभागीय आयुक्त यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोकण विभागातील 5 जिल्हाधिकाऱ्यांची सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पदनिर्देशित अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून पालघर जिल्हयातील 14 ठाणे - 14, रायगड- 23, रात्नागिरी- 14, सिंधुदूर्ग- 11 अशा 76 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून यामध्ये सहा. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांचा समावेश आहे.
1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या मतदार नोंदणीपात्रतेसाठी आवश्यक निकष सांगताना रानडे म्हणाले की, जी व्यक्ती भारताची नागरीक आहे व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची सर्वसाधारणपणे रहिवासी आहे. तसेच जिने दिनांक १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी लगतच्या सहा वर्षांमध्ये राज्यातील एखादया माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये एकूण किमान तीन वर्षे अध्यापनाचे काम केले आहे, अशी व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केले जाण्यास पात्र राहील. शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी सादर केलेल्या नमुना १९ मधील अर्जासोबत संबंधित व्यक्तीने दिनांक १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी लगतच्या सहा वर्षांमध्ये एखादया माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये एकूण किमान तीन वर्षे अध्यापनाचे काम केले असल्याबाबत शैक्षणिक संस्था प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. एखादी व्यक्ती अर्ज दाखल केलेल्या दिनांकास अध्यापनाचे काम करीत नसेल तर त्या व्यक्तीने अखेरीस ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये काम केले असेल त्या संस्थेच्या प्रमुखाने ते निवेदन प्रमाणित करणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक विहित नमुना अर्ज कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, प्रांत अधिकारी कार्यालये, तहसिलदार कार्यालये तसेच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा अर्ज मराठी किंवा इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये भरता येईल. विहित नमुन्यातील अर्ज भरल्यानंतर कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, प्रांत अधिकारी कार्यालये आणि तहसिलदार कार्यालये या ठिकाणी सादर करावयाचा असल्याचे उपआयुक्त यांनी यावेळी सांगितले. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या नव्याने तयार करण्यात येणाऱ्या याद्यांमध्ये जास्तीत जास्त शिक्षकांनी आपली नावे नोंदवावी असे आवाहन उपायुक्त मनोज रानडे यांनी केले.