दासगाव : दासगाव उर्दू शाळेमधील केंद्र क्रमांक ३ हे मतदान केंद्र जुन्या ठिकाणापासून दोन किमी दूर हलवल्यामुळे या केंद्रावर मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. उन्हातून पायपीट अगर गाडीने मतदान केंद्रावर पोहोचताना मतदारांनी नाराजी व्यक्त के ली.दासगाव विश्रामगृह येथे एक मतदान केंद्र, दासगाव मोहल्ल्यातील उर्दू शाळेमध्ये दोन मतदान केंद्र तर बामणे कोंड येथे एक मतदान केंद्र असे चार केंद्राच्या माध्यमातून दासगावमधील मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावत होते. यावर्षी दासगाव विश्रामगृह मोडकळीस आल्यामुळे येथील मतदान केंद्र दासगाव शाळेत हलवण्यात आले. बामणे कोंड येथे हलवण्यात आलेल्या या मतदान केंद्रात जवळपास ८०० मतदान असून दासगाव मोहल्ल्यातील मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. घराशेजारी मतदान केंद्र सोडून सुमारे दोन किमी अंतर असलेल्या बामणे कोंडच्या मतदान केंद्रावर मतदानाला जावे लागल्याने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर दिसून येत होता.सकाळी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दासगाव मोहल्ल्यातील अनेक मतदान नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या मतदान केंद्रावर पोहोचले. मात्र आपले मतदान या केंद्रावर नाही हे समजल्यानंतर मतदारांमध्ये थोडा गोंधळ झाला. राजकीय कार्यकर्ते आणि शासकीय अधिकाऱ्यांनी बदललेल्या मतदान केंद्राबाबत माहिती दिल्यानंतर मतदारांनी बामणे कोंड येथील मतदान केंद्र गाठले. वाढलेले अंतर दुपारच्या उन्हाची तीव्रता यामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर होता. वाढलेल्या या अंतरामुळे वृद्ध मतदारांना अधिक त्रास सहन करावा लागला. मात्र स्वत:ची पदरमोड करीत दासगावकरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदान केंद्रावर दासगाव मोहल्ला, पाटील आळी तसेच बौद्धवाडी अशा तीन ठिकाणचे मतदान होते. यावर्षी दासगाव मोहल्ल्यामधील मतदारांनी दूरवर जावून मतदान केले असले तरी निवडणूक आयोगाने या बदललेल्या केंद्राचे अंतर आणि नागरिकांना होणारा त्रास याची दखल घेत मोहल्ल्यातील मतदान केंद्र पुन्हा जुन्या ठिकाणी उर्दू शाळेत आणावे, अशी प्रतिक्रिया येथील समाजसेवक सलाम अब्दुला अनवारे यांनी दिली. (वार्ताहर)
मतदान केंद्र हलवल्यामुळे मतदार नाराज
By admin | Published: February 22, 2017 6:51 AM