नवी मुंबईतील मतदारांनी दाखवला मतदानात निरुत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:06 AM2019-05-01T00:06:31+5:302019-05-01T00:07:49+5:30

ठाणे लोकसभेसाठी झालेल्या मतदानात नवी मुंबईकरांचा निरुत्साह दिसून आला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून निम्म्यापेक्षाही कमी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे.

Voters in Navi Mumbai show no signs of frustration | नवी मुंबईतील मतदारांनी दाखवला मतदानात निरुत्साह

नवी मुंबईतील मतदारांनी दाखवला मतदानात निरुत्साह

Next

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : ठाणे लोकसभेसाठी झालेल्या मतदानातनवी मुंबईकरांचा निरुत्साह दिसून आला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून निम्म्यापेक्षाही कमी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. त्यापैकी कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात किती मतदान पडले हे २३ मेच्या मोजणीअंती स्पष्ट होणार असून, त्यावरूनच आगामी विधानसभेची गणिते बांधली जाणार आहेत.

ठाणे लोकसभेसाठी सोमवारी झालेल्या मतदानात नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून ४५.९२ टक्के मतदान झाले आहे. महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीला आठ लाख २४ हजार ७०२ मतदार नोंदीवर आहेत, त्यापैकी तीन लाख ७८ हजार ७२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचे प्रमाण अवघे ४५.९२ टक्के आहे. त्यापैकी ऐरोली विधानसभेतून ४३.४८ टक्के तर बेलापूरमधून ४८.८३ टक्के मतदान झाले आहे. मागील लोकसभेच्या तुलनेत यंदा दोन्ही विधानसभा क्षेत्रात मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे, त्यामुळे मतदानाचाही टक्का वाढणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता घसरलेल्या टक्क्यामुळे मतदारांचा निरुत्साह दिसून येत आहे. मतदानाचा टक्का घसरण्यामागे इतरही कारणे असून त्यामध्ये दुबार मतदारांच्या नोंदीसह सुट्टीची संधी साधून गाव गाठलेल्या मतदारांचेही प्रमाण दखलपात्र आहे. मात्र, लोकसभेच्या या मतदानावरून आगामी विधानसभेची बांधणी केली जाणार आहे. २३ मेला मतमोजणी झाल्यानंतर कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर कोणत्या राजकीय पक्षाची कसोटी लागणार आहे याचेही चित्र उघड होणार आहे.

सद्यस्थितीला बेलापूर विधानसभेत दोन लाख तीन हजार ३० मतदार असून, त्यापैकी अवघ्या एक लाख ८३ हजार ६२८ मतदारांनी मतदान केले आहे. त्यात पुरुषांचा आकडा अधिक असून, तो एक लाख १७२ इतका आहे. तर ऐरोली विधानसभा क्षेत्रात चार लाख ४८ हजार ६८१ मतदारांपैकी एक लाख ९५ हजार ९८ मतदारांनी मतदान केले आहे. त्यात महिलांचे प्रमाण ४३.४१ टक्के तर पुरुषांचे प्रमाण ४३.५४ टक्के इतके आहे. ऐरोली व बेलापूर विधानसभेच्या तुलनेत बेलापूरमध्ये कमी मतदार असतानाही मतदानाची टक्केवारी ऐरोलीपेक्षा अधिक आहे.
यंदा प्रथमच शासनाकडून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले, त्यानुसार नवी मुंबईतही मतदानाच्या जनजागृतीवर भर देण्यात आला होता. सार्वजनिक ठिकाणी पथनाट्यांसह तरुणांमध्ये मतदानाच्या हक्काविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली आहे.

यानंतरही ५० टक्क्यांचाही आकडा पार होऊ शकलेला नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हा टक्का वाढवण्यासाठी कसोटी लागणार आहे. तृतीयपंथी दुर्लक्षितच शहरात अनेक ठिकाणी तृतीयपंथीचे वास्तव्य दिसून येत आहे. त्यांच्यातही मतदानाविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक असतानाही केवळ ३३ तृतीयपंथीची मतदारयादीत नोंदणी असून त्यापैकी तिघांचा बेलापूरमध्ये तर उर्वरितांचा ऐरोली विधानसभेत समावेश आहे. त्यापैकी ऐरोलीत अवघ्या आठ तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे.

फुगीर आकड्याची डोकेदुखी

मतदानाचा टक्का घसरण्यामागे मतदारयादीतल्या फुगीर आकड्याचेही प्रमुख कारण मानले जात आहे. अनेक मतदारांची एकाच विधानसभेत दुबार नावे असून अनेक मयतांची नावेही यादीतून वगळण्यात आलेली नाहीत. दुबार मतदारांमध्ये भाडोत्री रहिवाशांचा सर्वाधिक समावेश आहे. मात्र, यंत्रणेतील ढिसाळ कारभारामुळे एका ठिकाणचे नाव न वगळता दुसऱ्या ठिकाणी नावाची नोंदणी होत असल्याने मतदारांचा आकडा फुगत चालला आहे. तर काही ठिकाणी बोगस मतदारांची देखील नोंदणी होत असून दोन्ही विधासभेतील अशा बोगस मतदारांची नावे यापूर्वीही राजकीय पक्षांनी निवडणूक विभागाकडे सुपूर्द केलेली आहेत. त्यामुळे देखील मतदारांचा आकडा फुगत असून एकूण मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होत आहे.

Web Title: Voters in Navi Mumbai show no signs of frustration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.