उरणमध्ये विकासाच्या मुद्द्यांवर जागरूक मतदारांंचे मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 12:42 AM2019-10-26T00:42:05+5:302019-10-26T00:42:10+5:30
उरण विधानसभा मतदारसंघात असलेल्या विविध प्रकल्प आणि कंपन्यांमुळे उरण औद्योगिक नगरी म्हणून नावारूपाला येऊ लागली आहे.
- मधुकर ठाकूर
उरण : उरण विधानसभा मतदारसंघात असलेल्या विविध प्रकल्प आणि कंपन्यांमुळे उरण औद्योगिक नगरी म्हणून नावारूपाला येऊ लागली आहे. या मतदारसंघात कोणत्या ना कोणत्या कारणावरून सातत्याने आंदोलने होत असतात. त्यामुळे हा मतदारसंघात अत्यंत जागरूक मतदार म्हणून ओळखला जात आहे. दहा वर्षांपूर्वी नव्याने निर्माण झालेल्या या मतदारसंघात मागील दोन विधानसभेच्या निवडणुकीत एकाच पक्षाला संधी न देता प्रत्येक वेळी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे उमेदवार निवडून दिले आहेत. तिसऱ्यांदा सोमवारी पार पडलेल्या या निवडणुकीतही मतदारसंघात विकासकामे करण्याची तयारी असलेल्या भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांना मतदारांनी निवडून दिले आहे.
२००९ मध्ये नव्याने निर्माण झालेल्या उरण विधानसभा मतदारसंघात पहिल्यादाच झालेल्या निवडणुकीत शेकापचे विवेक पाटील यांना निवडून दिले होते. मोठ्या विश्वासाने निवडून दिलेले आमदार विवेक पाटील हे पाच वर्षांत नारिकांच्या समस्या आणि मतदारांंचे प्रश्न सोडविण्यात सपशेल अपयशी ठरले. त्यानंतर २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविल्या. विकासाचे आणि उरणकरांच्या समस्या सोडविण्यासाठी उरणचाच आमदार हवा या प्रमुख राजकीय मुद्द्यावर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शेकापचे विवेक पाटील यांना दुहेरी संधी न देता निवडणुकीत सेनेच्या मनोहर भोईर यांना मतदारांनी विजयाचा कौल दिला.
सुदैवाने राज्यात आणि केंद्रातही सेना-भाजप सत्तेवर आले. मात्र, दोन्हीकडे सत्ता असतानाही आमदार मनोहर भोईर यांना मात्र उरण मतदारसंघाचा विकास करता आलेला नाही. उरण विधानसभा मतदारांच्या हाती विकासकामांचा भोपळाच आला. बेरोजगारी, जेएनपीटी, साडेबारा टक्के भूखंडवाटपाचा प्रश्न, वाहतूककोंडी, रु ग्णालय उभारणी आदी सामान्यांना भेडसावणारे जिव्हाळ्याचे प्रश्नही मनोहर भोईर यांना सोडविता आलेले नाहीत. परिणामी, निष्क्रिय आणि बिनकामाचा आमदार म्हणून जनतेने मनोहर भोईर यांच्या माथी मारला आणि दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून देतात त्यांना घरचा रस्ता दाखवला.
उरण विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे महेश बालदी यांनी स्वबळावर निवडणूक लढविली होती. मात्र, मतदारांनी बालदी यांना चौथ्या क्रमांकावर फेकून दिले होते. मात्र, पराभवाची तमा न बाळगता महेश बालदी यांनी पराभवाच्या दिवसांपासूनच मतदारसंघात पुढल्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. नगरसेवक, नगराध्यक्ष, जेएनपीटी ट्रस्टी, भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस आदी पदे भूषविणाºया बालदी यांनी उरण मतदारसंघात संघटनेची मजबूत बांधणी केली. राज्य आणि केंद्रातही सेना-भाजप सत्तेवर असलेल्याचा मोठ्या खुबीने वापर करून उरण मतदारसंघात सुमारे ५०० कोटींची विकासकामे केली.
लोकप्रतिनिधी नसतानाही बालदी यांनी केलेल्या कामांची मतदारांनाही चांगलीच भुरळ घातली. तसेच त्यांनी सत्तेतील ओळखीचा फायदा उठवत विविध योजना आणि कोट्यवधींचा आमदार, खासदार निधीही मतदारसंघात विकासकामांसाठी खर्ची घातला. बालदी यांच्या या विकासकामांच्या धडाक्याने मतदारही चांगलेच प्रभावित झाले. त्याचा फायदा उठवत त्यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून समर्थन दिले जात होते. विरोधक विशेषत: शिवसेना मात्र असे काही घडणारच नाही या अंध विश्वासावर ठाम होती.
निवडणुकीच्या आखाड्यातही बालदी यांच्या विरोधात विरोधकांनी जातीपातीचे आणि बदनामी करण्याच्या सुरू केलेल्या हीन राजकारणाला मतदारांनी भीक घातली नाही. त्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघातील २० पंचायत समितीमधील विरोधकांचे वर्चस्व असलेल्या चाणजे, केगाव, गुळसुंदे, पळस्पे आणि उरण शहरात मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून महेश बालदी विजयी झाले.
च्यासाठी बालदी यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून जुंपली तर उरण, पनवेल, खालापूर तालुका अध्यक्ष, नगराध्यक्ष, नगरसेवकांचीही प्रचारात उघडपणे साथ लाभली. शेकापचे विवेक पाटील यांना मतदारसंघातील २० पंचायत समितीमधील जासई, विंधणे, आपटा, करंजाडे, केळववणे, पोयंजे, वडघर, गव्हाण, वहाळ या नऊ तर भेडखळ, नवघर, आधारे, चिरनेर, चांभार्ली, चौक, वडगाव, वासांबे या सात पंचायत समितीमध्ये अधिक मतदान होऊनही पराभव पत्करावा लागला.