वैभव गायकर,पनवेल: सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवरती स्वीप कार्यक्रमांतर्गत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्यावतीने चार हलते मुखवटे अर्थात शुभंकर (मस्कॉट्स) चार प्रभागांमध्ये पुरविण्यात आले असुन सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना पुढील दहा दिवस या मुखवट्यांच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणी मतदार जनजागृती करण्यातबाबत आदेशित करण्यात आले आहे.
पनवेल विधानसभा मतदार संघांतर्गत महापालिका कार्यक्षेत्र तसेच पनवेल ग्रामीण भागात केली जात आहे. आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथक प्रमुख अधिकारी मुख्य अभियंता संजय जगताप यांच्या सूचनेनूसार पालिकेतील अधिकारी व कर्मचारी मतदार जनजागृती कार्यक्रम राबवित आहेत. मतदान जनजागृती अभियानाचा भाग म्हणून चार हलते मुखवटे (शुभंकर ) चारही प्रभागांना पुरवण्यात आले आहेत. त्या मुखवट्या सोबत प्रत्येकी दोन माणसे देण्यात आली आहे. प्रभागातील गर्दीच्या ठिकाणी या मुखवट्यांद्वारे मतदार जन जागृती करण्याबाबत प्रभाग अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पुढील दहा दिवस हा कार्यक्रम राबवाविण्यात येणार आहे.
याचबरोबर आशा सेविकांनी सेक्टर 1,8,13 नवीन पनवेल, भुसार मोहल्ला,कुंभार वाडा पनवेल, सेक्टर3 खारघर, सेक्टर 19 कामोठे, कळंबोली, साईनगर, तळोजा पाचनंद, आसुडगाव अशा विविध ठिकाणी नागरिकांच्या बैठका घेऊन मतदान जनजागृती केली.
तसेच महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवारा केंद्र पनवेल, व भीमनगर झोपडपट्टी येथे नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. तसेच पनवेल तालुक्यातील मालडुंगे, नेरे, ऊसर्ली खुर्द, केवाळे अशा ग्रामीण भागात देखील नागरिकांना आवाहन पत्राचे वाटप करून मतदान जनजागृती करण्यात येत आहे.