मुंबई बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 03:55 AM2020-02-28T03:55:41+5:302020-02-28T03:55:55+5:30
३४ जिल्ह्यांत उद्या निवडणूक; १७,५१३ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
- नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. २९ फेब्रुवारीला राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार असून, त्यासाठी मतपेट्या गुरुवारी सर्व ठिकाणी रवाना केल्या आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. संपूर्ण राज्यभर निवडणुकीची यंत्रणा राबविली जात आहे. सहा महसूल विभागामधून १२ शेतकरी प्रतिनिधी व बाजार समितीमधून पाच व्यापारी व एक कामगार प्रतिनिधीची निवड मतदानाने करायची आहे.
प्रत्येक महसूल विभागातून दोन सदस्यांची निवड केली जाणार असून, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतदानकेंद्र तयार करण्यात आले आहे. एकूण ३४ जिल्ह्यांमध्ये मतदान घेतले जाणार असून, व्यापारी प्रतिनिधींची निवड करण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मतदानकेंद्र तयार करण्यात आले आहे.
निवडणुकीसाठी मतपेट्यांची पाहणी करून, त्या सर्व मतदानकेंद्रांवर पाठविण्यात आल्या आहेत. यासाठी बाजार समिती मुख्यालयामध्ये निवडणूक यंत्रणा दिवसभर परिश्रम करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांवर मतदान सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बाजार समितीमध्येही मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये राज्यातील ३०५ बाजार समितीचे संचालक हे मतदार असतात. व्यापारी प्रतिनिधी निवडण्यासाठी अडते व अ वर्ग खरेदीदारांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. या वर्षीच्या निवडणुकीसाठी २० हजार नऊ मतदारांची नोंदणी झाली आहे. यापैकी फळ व कामगार मतदारसंघातील निवड बिनविरोध झाली असल्यामुळे येथील २,४३६ जणांचे मतदान होणार नाही. उर्वरित १६ सदस्यांची निवड करण्यासाठी १७,५१३ मतदार मतदानाच हक्क बजावणार आहेत. सर्वात कमी २८१ मतदार कोकण महसूल विभागात असून, सर्वाधिक १,७९९ मतदार भाजीपाला मार्केट मतदारसंघामध्ये आहेत.