शिक्षकांसह पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी १२ मे पर्यंत मतदान नोंदणीची संधी
By नामदेव मोरे | Published: May 10, 2024 04:07 PM2024-05-10T16:07:27+5:302024-05-10T16:09:53+5:30
रविवारी मतदान नोंदणी कक्ष राहणार सुरू, निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी.
नवी मुंबई: मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी १२ मे पर्यंत मतदान नोंदणी सुरू ठेवण्यात आली आहे. रविवारीही कोकण भवन मधील मतदान नोंदणी कक्ष सुरू ठेवला जाणार आहे. ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया ही सुरू आहे.
कोकण विभागीय महसूल आयुक्त पी वेलारासू यांनी निवडणुकीविषयी माहिती पत्रकार परिषदेत दिली. मुंबई पदवीधर मतदार संघासाठी ९१२६३ मतदार आहेत. मुंबई शिक्षक मतदार संघासाठी १४५१५ व कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी १७७०३२ मतांची नोंदणी झाली आहे. मतदानापासून कोणीही शिक्षक व पदवीधर वंचित राहू नये यासाठी मतदार नोंदणीची मुदत १२ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासाठी gterollregistration.mahait.org वर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. याशिवाय कोकण भवनमध्ये ही अर्ज स्विकारले जाणार आहेत. रविवारी सायंकाळी सव्वासहा पर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे.
तीनही मतदार संघासाठी कोकण विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहतील. मुंबई शिक्षक मतदार संघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ या दोन मतदारसंघासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाकरिता ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी व कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. अशी माहिती आयुक्त पी.वेलरासू यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेत उपआयुक्त (आस्थापना) विवेक गायकवाड, उपआयुक्त (सामान्य) अमोल यादव, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे उपस्थित होते
तक्रार निवारण कक्ष भरारी पथके सक्रिय -
जिल्हास्तरावर आचारसंहिता स्थायी समितीची स्थापना करण्यात आली आहे, या समितीत जिल्हाधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष, माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समिती व भरारी पथक स्थापन करण्यात आली आहेत.
तालुकास्तरावर व्हिडीओग्राफी पथक तयार करण्यात आले असून, या पथकांमार्फत राजकीय पक्ष/लोकप्रतिनिधी यांच्या दौऱ्यादरम्यान आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत पर्यवेक्षण करण्यात येत आहे. विभागीयस्तरावर चोवीस तास चालू असलेला तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
मतदार संघ निहाय मतदार-
मतदार संघाचे नाव स्री पुरूष एकूण
मुंबई पदवीधर- ३७६१९ ५३६४१ ९१२६३
मुंबई शिक्षक- १०८४९ ३६६६ १४५१५
कोकण विभाग पदवीधर- ७४५७५ १०२४४२ १७७०३२
निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे-
१) निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक- १५ मे
२) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अखेरची तारीख- २२ मे
३) नामनिर्देशन पत्राची छाननी- २४ मे
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक- २७ मे
१) मतदानाचा दिनांक-१० जून
२) मतदानाची वेळ- सकाळी ८ ते दुपारी ४
३) मतमोजणी दिनांक-१३ जून
४) निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक- १८ जून