पनवेल : महापालिकेतील निवडणुकीचे काम योग्य पध्दतीने सुरू आहे. त्यामुळे ही निवडणूक निर्भयपणे पार पडेल, असा विश्वास राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी व्यक्त केला. गुरुवारी पनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची पूर्वतयारीसाठी आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी सहारिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला.पूर्वीची नगरपरिषद आणि नव्याने विकसित झालेला खारघरसारखा शहरी भाग आणि ग्रामीण भाग यांना एकत्र करून स्थापन झालेल्या महापालिकेची २४ मे रोजी निवडणूक होत आहे. यासाठी ६ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून प्रक्रिया चांगल्या पध्दतीने सुरू आहे. मतदानाची तारीख जशी जवळ येईल तसा पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात येईल. आढावा बैठकीत घेतलेल्या माहितीनुसार निवडणुकीचे काम चोख पध्दतीने सुरू असून पोलिसांनी देखील अतिसंवेदनशील भाग, समाजविघातक व्यक्ती यावर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. १२ मे नंतर प्रचाराने वेग घेतल्यावर बंदोबस्त कारवाई जोरात सुरू होईल, अशी माहिती सहारिया यांनी दिली.पनवेल परिसरातील ५७० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यावेळी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलीस बंदोबस्त आवश्यक तेवढा पुरविण्यात येणार असून समाजविघातक व्यक्तींना हद्दपार करण्यासाठी माहिती तयार झाली असून अल्पावधीतच कारवाई सुरू करण्यात येईल. निवडणूक निर्भयपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे ते म्हणाले. यावेळी पनवेल महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर, सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड, पोलीस उपायुक्त डॉ. राजेंद्र माने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मतदान निष्पक्षपणे पार पडेल
By admin | Published: May 05, 2017 6:26 AM