नवी मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी मतदारांना पारदर्शक मतदान करता यावे, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने नवीन व्हीव्हीपॅट या अत्याधुनिक मशीनचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक दाखविण्याचा कार्यक्रम नवी मुंबई महापालिकेच्या कोपरखैरणे विभाग कार्यालयात करण्यात आला.
नवी मुंबईत सर्वप्रथम ऐरोली 150 विधानसभा मतदार संघात या मोहिमेचा आज शुभारंभ करण्यात आला. ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅट म्हणजेच योग्य उमेदवारालाच मत पडल्याचे पडताळणी करणारे हे अत्याधुनिक यंत्र आहे. अशी माहिती ठाण्याचे उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना या यंत्रणेची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. तसेच या मशीनच्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. यापूर्वी या यंत्राचा वापर महाराष्ट्रात पालघर आणि गोंदिया जिल्ह्यात करण्यात आला होता. अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काही ठिकाणी याच मतदान यंत्रांचा चा वापर करण्यात आला आहे.
यावेळी निवडणूक यंत्रणा जनजागृती कार्यक्रम प्रसंगी ठाण्याच्या तहसीलदार आसावरी संसारे, नायब तहसीलदार सिंधू खाडे, महापालिका कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.