विजय मांडे , कर्जतमुंबईपासून रेल्वेने ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघिणीवाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. दळी जमिनीवर वसलेल्या या वाडीच्या चोहोबाजूला वनजमीन असून, रस्त्याच्या सोयीपासून ही वाडी वंचित आहे. वनखात्याचे जाचक कायदे आदिवासी वाडीसाठी शिथिल होत नसल्याने, आम्ही पारतंत्र्यात राहतो का? असा उद्विग्न सवाल आदिवासी बांधव विचारत आहेत.वाघिणीवाडी ही कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायतमध्ये असलेली आदिवासीवाडी बेडीसगाव या मुख्य वाडीपासून डोंगरात चार किलोमीटर अंतरावर वसली आहे. बेडीसगाव ही आदिवासी वाडीदेखील वनखात्याच्या दळी जमिनीवर वसली असून, वाघिणीवाडी माथेरानच्या डोंगर रांगेत वसली आहे. ही वाडी जरी कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक म्हणून ओळखली जात असली, तरी या वाडीचा सर्व व्यवहार ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावात होत असतो. शेलू ग्रामपंचायतमधील या वाडीमध्ये जाण्यासाठी असलेला रस्ता हा ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावातून जातो. त्यांची ग्रामपंचायत फक्त शेलू असून, त्यांचा दैनंदिन व्यवहार वांगणी गावाशी संबंधित आहे. वाघिणीवाडी आणि बेडीसगाव येथील आदिवासींना ग्रामपंचायत कार्यालयात यायचे असले, तरी किमान दहा कि.मी.चा फेरा घेऊन यावे लागते, त्यामुळे या वाड्याच्या सोयीसाठी काही वेगळी व्यवस्था कर्जत तालुक्यातील प्रशासनाने करण्याची गरज आहे.बेडीसगाव आणि वाघिणीवाडी येथील अनेक समस्या आदिवासी लोकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. त्यातही वाघिणीवाडी म्हणजे हा प्रदेश आजही पारतंत्र्यात आहे का? असा प्रश्न आदिवासी लोकांचा आहे. कारण वनविभाग आदिवासींच्या शंभर वर्षांपासून वहिवाट असलेल्या रस्त्यातून जाण्याचा रस्ता बनविण्यास हरकत घेत आहेत. वनखाते अस्तित्वात नव्हते. त्या आधी वाघिणीवाडीमध्ये आदिवासी लोकांची वस्ती आहे. माथेरानच्या डोंगर रांगेत वसलेल्या या वाडीमध्ये जाण्यासाठी बेडीसगाव येथून स्थानिक आदिवासीना दीड तास लागतो, तर नव्याने आलेल्यांची वाडीपर्यंत पोहोचताना दमछाक होते. डोंगरात वसलेल्या या वाडीच्या खालच्या बाजूने एक मोठा ओढा पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असतो. पावसाळ्यात वाघिणीवाडीतील लोकांना बेडिसगावपर्यंत येता येत नाही. कारण ओढ्यातून वाट काढून पलीकडे जाणे आदिवासी लोकांनादेखील शक्य होत नाही. तेथे इतर लोकांना, लहान मुलांना ओढा ओलांडणे ही फार दूरची गोष्ट होऊन बसली आहे. वनविभागाने त्या ओढ्यावर लहान साकव बांधण्यासाठी जमीन दिल्यास या आदिवासी लोकांच्या पावसाळ्यातील ये-जा करण्याचा प्रश्न निकाली निघेल. पाऊस जास्त असतो, त्या वेळी जवळपास शहरात जाऊन कामासाठी बाहेर पडणे कठीण होते. त्यामुळे त्यांचा रोजगारदेखील बुडतो.
वाघिणीवाडी रस्त्यापासून वंचित
By admin | Published: September 09, 2016 3:11 AM