सिडकोच्या घरांसाठी आणखी वाट पाहा, विविध कारणांमुळे सोडतीस होतोय विलंब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 03:16 PM2024-08-07T15:16:26+5:302024-08-07T15:16:39+5:30
सिडकोने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधील ३,३२२ घरांची योजना जाहीर केली होती. परंतु, विविध कारणांमुळे या योजनेची सोडत काढण्यास विलंब झाला.
नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून विविध नोडमध्ये गृहप्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. या घरांची योजना कधी जाहीर होणार, अशी विचारणा ग्राहकांकडून केली जात आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर यातील काही घरांची योजना जाहीर केली जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, आता ही शक्यता धूसर झाली असून, सिडकोचे घर घेण्यासाठी इच्छुक ग्राहकांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सिडकोने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधील ३,३२२ घरांची योजना जाहीर केली होती. परंतु, विविध कारणांमुळे या योजनेची सोडत काढण्यास विलंब झाला. गेल्या महिन्यात या योजनेची सोडत पार पडल्यानंतर आता नवीन योजना कधी जाहीर होणार, अशी विचारणा ग्राहकांकडून केली जात आहे.
अहवाल प्रलंबित
राज्य शासनाच्या निर्देेशानुसार सिडकोने याबाबतचा अहवाल संबंधित विभागाला सादर केला आहे. मागील एक वर्षांपासून या अहवालावरील निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळेसुद्धा घरांची नवीन योजना जाहीर करण्यास सिडको धजावत नसल्याचे बोलले जात आहे. असे असतानाही सिडकोने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर घरांची योजना जाहीर केली होती. त्याच धर्तीवर नवीन योजना घोषित करावी, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.
सल्लागार संस्थेची नेमणूक
- सिडको सध्या वाशी, जुईनगर, मानसरोवर, खारघर, खांदेश्वर आदी नोडमध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जवळपास २५ हजार घरांचे बांधकाम करीत आहे. या प्रकल्पांत लहान आणि मोठ्या आकाराची घरे आहेत.
- तसेच ही घरे प्राइम लोकेशनमध्ये उभारली जात असल्याने बहुतांश ग्राहकांना या प्रकल्पांतील घरांच्या योजनेची प्रतीक्षा आहे.
- सिडकोने घरांचे मार्केटिंग आणि विक्रीसाठी खासगी सल्लागार संस्थेची नेमणूक केली आहे. परंतु, सल्लागार नियुक्तीचे हे प्रकरण सध्या राज्य शासनाकडे निवाड्याच्या प्रतीक्षेत आहे.