प्रतीक्षा संपली, नवीन वर्षात धावणार नवी मुंबई मेट्रो!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 01:34 AM2019-11-05T01:34:32+5:302019-11-05T01:35:25+5:30
सिडकोच्या मार्फत नवी मुंबई मेट्रोसाठी २०२० मे महिन्याची नवीन डेडलाईन देण्यात आली आहे
वैभव गायकर
पनवेल : बहुप्रतीक्षित नवी मुंबईमेट्रोच्या उद्घाटनाला अखेर २०२० चे मुहूर्त मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी घाईघाईत मेट्रोची चाचणी घेण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रोची यशस्वी चाचणी पार पाडल्यानंतर नेमकी मेट्रो धावणार कधी? असा प्रश्न नवी मुंबईकराना पडला होता.
सिडकोच्या मार्फत नवी मुंबई मेट्रोसाठी २०२० मे महिन्याची नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. ११ स्थानकांचा समावेश असलेल्या ११ किमीच्या या मार्गाचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रोचा पहिला टप्पा आहे.
२०११ मध्ये मेट्रोच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. चार हजार कोटीचा खर्च याकरिता अपेक्षित होता. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याच्या डेडलाईन वारंवार बदल्यात आल्या. पहिली डेडलाईन २०१४ मध्ये देण्यात आली.
विविध कारणांमुळे कामाचा वेग मंदावल्याने पुन्हा २०१५ त्यानंनतर २०१७ ची डेडलाईन सिडकोच्या वतीने देण्यात आली. मात्र ही डेडलाईनही चुकल्याने आता अखेर २०२० मध्ये मे महिन्यापर्यंत नवी मुंबई मेट्रो मार्गावर धावणार असल्याची माहिती सिडकोच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यादरम्यानच्या ११ स्थानकांच्या सजावटीचे काम सध्या वेगात सुरु आहे. स्टेशनवरील प्लॅटफॉर्म, ट्रॅक, सिग्नल, टेलिकम्युनिकेश उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरत लवकर हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित खारघरमधील भाजपच्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नवी मुंबई मेट्रोचा उल्लेख केला होता. खारघर वासियांना मेट्रोचा फायदा होणार असून शहरातील वाहतुक कोंडी या मेट्रोमुळे फुटणार आहे.
तळोजाच्या प्रवेशद्वारावर
लोखंडी पूल
मेट्रोच्या कामादरम्यान तळोजाच्या प्रवेशद्वाजवळ सिडकोच्या माध्यमातून लोखंडी पूल उभारण्यात आले आहे. शंभर मीटर लांबीचा हा पूल उभारण्यासाठी सहा क्रेन, सिडकोसह रेल्वे अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा यावेळी उपास्थित होता. पुलाखालून मुंबई मडगाव रेल्वे मार्ग असल्याने रेल्वेचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.
डेपोचे काम पूर्ण
मेट्रोकरिता सुमारे २६ हेक्टर जागेवर १३२ कोटी खर्चून अद्ययावत कारशेड, डब्यांची देखरेख दुरुस्ती आदींसाठी स्वतंत्र्य यंत्रणा उभारण्यात आली आहे. या डेपोचे काम पूर्णत्वाला आले आहे. या व्यतिरिक्त स्टेशन कॉम्प्लेक्सचे काम पूर्ण झाले आहे. नवी मुंबई मेट्रोचे डब्बे थेट चीनवरून नवी मुंबईत दाखल झाले आहेत.
नवी मुंबई मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील वर्षी हे काम पूर्ण होणार असून मे महिन्यापर्यंत बेलापूर ते पेंधर या मार्गावर नवी मुंबई मेट्रो धावताना दिसेल.
- प्रिया रातंबे (जनसंपर्क अधिकारी , सिडको )
११ किमीच्या मार्गाचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण
स्थानकांच्या सजावटीचे काम सध्या प्रगतिपथावर
नवी मुंबई शहरातील वाहतूक कोंडी फुटणार