अलिबाग : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये प्रकल्पबाधित झालेल्या गणेशपुरी-सिद्धार्थनगर येथील मागासवर्गीयांच्या १५८ घरांचे सिडकोच्या माध्यमातून पुनर्वसन व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सिद्धार्थनगर सामाजिक संस्थेच्या वतीने यासंदर्भात रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना शनिवारी निवेदन देण्यात आले. सिद्धार्थनगरचे पुनर्वसन व्हावे यासाठी मागील अनेक वर्षांपासून सिद्धार्थनगर सामाजिक संस्था ही सरकार दरबारी आपल्या मागण्या मांडत आहे.नवी मुंबई विमानतळात बाधित होणाºया गावांची व तेथील लोकांची २८ मे २०१८ रोजी सिडकोने प्रकाशित केलेल्या यादीमध्ये एकूण ५२ प्रकल्पग्रस्तांची नावे आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे सिद्धार्थनगर येथे रहात नसलेल्या सहा लोकांची नावे समाविष्ट आहेत. मूळ राहणाºया प्रकल्पग्रस्तांची नावे वगळून बाहेरची नावे घुसवणाºया सिडको अधिकाºयांची चौकशी व्हावी,अशी मागणी सिद्धार्थ नगरसामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.आगरी, कोळी, कराडी ओबीसी प्रकल्पग्रस्तांना देतात तसाच २००० रु पये प्रति चौरस फूट बांधकाम खर्च या मागासवर्गीय प्रकल्पग्रस्तांना मिळायला हवा. त्याचप्रमाणे शाळा, आरोग्य केंद्र, बुद्धविहार, समाजमंदिर, खेळाचे मैदान, मार्केट अन्य सुविधा एका आदर्श मागासवर्गीय वस्तीस मिळायला हवी. त्याची नोंद घेवून पावसाळ्यापूर्वी सुधारित यादी प्रसिद्ध न केल्यास सिडकोसमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे प्रकाश जाधव यांनी सांगितले.
विमानतळबाधित सिद्धार्थनगरचे १५८ प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 3:11 AM