आगाराच्या कामाला मुहूर्ताची प्रतीक्षा
By admin | Published: June 23, 2017 06:04 AM2017-06-23T06:04:05+5:302017-06-23T06:04:05+5:30
गुजरात परिवहन महामंडळाच्या सुरत येथील आगाराप्रमाणे पनवेलचे एसटी आगार बांधणार, अशी घोषणा करून दोन वर्षे उलटली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : गुजरात परिवहन महामंडळाच्या सुरत येथील आगाराप्रमाणे पनवेलचे एसटी आगार बांधणार, अशी घोषणा करून दोन वर्षे उलटली. मात्र, अद्याप या कामास सुरुवात झालेली नाही. शिवाय, २०१८पर्यंतही हे काम सुरू होऊ शकणार नाही, अशी कबुली महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पनवेलकरांना अद्ययावत सोयी-सुविधांयुक्त आगाराचे स्वप्न पूर्ण होण्यास अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आगार अद्ययावत कराल तेव्हा करा. मात्र, पावसाळ्यात आगारातील खड्डे तरी भरा, अशी प्रवाशांची मागणी आहे.
मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या पनवेलमधून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात एसटीच्या गाड्या जातात. नैना प्रकल्पामुळे पनवेलचे महत्त्व वाढले आहे. येथील नागरीकरणाच्या वाढण्याचा वेग पाहून एसटी आगाराचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.
परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुजरात परिवहन मंडळाच्या सुरत येथील आगाराप्रमाणे पनवेलचे एसटी आगार बीओटी तत्त्वावर (बांधा, वापरा, हस्तांतरित करा), बांधण्याचा निर्णय घेऊन नवीन २८० कोटींचा प्रस्ताव तयार केला. त्याची निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख २७ जून २०१७ आहे. त्यानंतर त्या प्रस्तावाची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. प्रस्ताव योग्य वाटल्यास वित्त शाखेकडून तपासणी केली जाईल. त्यानंतर संचालक मंडळाची मंजुरी व शेवटी सरकारची मंजुरी.
या प्रक्रि येतून गेल्यावर पनवेल महापालिकेची मंजुरी मिळाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरु वात होईल, अशी माहिती एसटी महामंडळाच्या व्यापारी संकुलाचे विभागीय अभियंता माधव ताटके यांनी दिली आहे.
पनवेल आगाराच्या आवारात अनेक मोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचून सर्वत्र चिखल तयार होतो. त्यातून मार्गक्रमण करताना प्रवाशांना कसरत करावी लागते. शिवाय, बसचे टायर पंक्चर किंवा फुटण्याचा धोका उद्भवू
शकतो.
आगार प्रमुखांच्या कार्यालयात जातानाही साचलेल्या पाण्यातून, चिखलातून जावे लागते. आगाराचे नूतनीकरण होणार म्हणून येथील खड्डे बुजवण्याच्या कामाकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.