प्रतीक्षा बांगलादेशींच्या कागदपत्रांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:18 AM2020-02-21T00:18:47+5:302020-02-21T00:18:51+5:30
शासकीय कार्यालयांकडे पाठपुरावा : माहिती देण्यात दिरंगाई
मयूर तांबडे
पनवेल : पनवेल परिसरामध्ये सापडलेल्या बांगलादेशींकडे आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना यासह विविध दाखले मिळाले होते. हे सर्व दाखले व परवाने मिळविण्यासाठी संबंधितांनी कोणते पुरावे जोडले होते याचा तपशील पोलिसांनी संबंधित विभागांकडे मागितला आहे. परंतु याविषयी माहिती मिळण्यास विलंब होत असून काही कार्यालयांमध्ये मूळ कागदपत्रे सापडत नसल्याचेही निदर्शनास आले आहे.
मूळ बांगलादेशी नागरिक असलेला इनामुल मुल्ला हा पनवेलमधील चिखले येथे मनोहर पवार नावाने घरजावई बनून राहत होता. २०१९ च्या वर्षअखेरीस पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे रेशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, पारपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, लायसन्स, वय आणि अधिवास दाखला यांसह विविध शासकीय दाखले सापडले होते. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. हे दाखले काढण्यासाठी त्याच्याकडून कोणकोणती कागदपत्रे वापरण्यात आली होती याची माहिती पोलिसांनी शासकीय कार्यालयांकडून मागवली आहे. पनवेल आरटीओ, पनवेल तहसील, ग्रामपंचायत आणि पॅन कार्ड कार्यालयाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. अद्यापही आधार कार्ड, मतदान ओळखपत्र यांच्याकडून तालुका पोलिसांना माहिती देण्यात आलेली नाही. खांदेश्वर पोलिसांनी अटक केलेल्या बांगलादेशी महिलेला एका नगरसेवकाने मदत केल्याचे समोर येत असून संबंधितांवर अद्याप काहीही कारवाई झालेली नाही.
बांगलादेशी नागरिकांच्या गुन्ह्याच्या तपास करताना बनावट कागदपत्र तयार केल्याचे समोर आले आहे. विविध शासकिय दाखले व परवाने मिळविताना संबंधीतांनी कोणती कागदपत्रे सादर केली याचीही माहिती पोलिस घेत असून त्याचाच भाग म्हणून विविध विभागांकडून माहिती मागविली आहे.
पोलिसांनी वाहन परवान्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांची प्रत मागितली होती. परंतु याविषयीची कागदपत्रे आढळून आलेली नाहीत. पोलिसांना परवान्याची प्रत काढून देण्यात आलेली आहे.
- मनोज ओतारी, साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल