नुकसानग्रस्त झोपडपट्टीवासी मदतीच्या प्रतीक्षेत
By admin | Published: February 14, 2017 04:35 AM2017-02-14T04:35:47+5:302017-02-14T04:35:47+5:30
शहरातील इंदिरानगर झोपडपट्टीला आग लागून आठवडा उलटत आला तरी नुकसानग्रस्तांना अद्याप प्रशासनाकडून कोणतीही
पनवेल : शहरातील इंदिरानगर झोपडपट्टीला आग लागून आठवडा उलटत आला तरी नुकसानग्रस्तांना अद्याप प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. ज्या सात झोपड्या खाक झाल्या ती कुटुंबे शेजारच्या झोपडीत राहत आहेत.
पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष मनोज भुजबळ व सामाजिक कार्यकर्त्या सुशीला घरत यांनी त्यांना काही आर्थिक मदत दिली. मंगळवार, ७ फेब्रुवारी रोजी इंदिरानगर झोपडपट्टीला आग लागली. आगीत सात झोपड्या खाक झाल्या. राजकीय पक्षांबरोबरच अनेकांनी घटनास्थळी भेट दिली, फोटोही काढले मात्र रहिवाशांना अद्याप प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. मंगळवारपासून सातही कुटुंबे शेजाऱ्यांकडे राहत आहेत. बारावीत शिकणाऱ्या हिना शेख हिला एका डॉक्टरांनी पुस्तके भेट दिली.
मनोज भुजबळ व सुशीला घरत यांनीच आर्थिक मदत दिली. जानबी शेख इंदिरानगरमध्ये गेल्या ३० वर्षांपासून दोन मुलींसह याठिकाणी राहत आहेत. हिना बारावी विज्ञान शाखेत शिकत असून तिची परीक्षा सोमवारपासून सुरू होत आहे. मात्र पुस्तकांसह तिचे हॉल तिकीटही खाक झाले. नवीन हॉल तिकिटासाठी महाविद्यालयाने पोलीस पंचनामा मागितला आहे. मात्र त्याची प्रत अद्याप न मिळाल्याने परीक्षा देता येईल की नाही, याची चिंता आहे. तिची आई व बहीण रजिया कपडे शिवून उदरनिर्वाह करतात. नगरपालिकेकडून कर्ज घेऊन त्यांनी दोन मशीन घेतल्या होत्या, त्याही खाक झाल्या आहेत. रजियाच्या लग्नासाठी एक-एक वस्तू घेऊन ठेवली होती, ते सर्वच खाक झाले आहे. रहेमान शेख व त्यांची पत्नी मुमताज बांधकामावर मजुरी करतात. आग लागली तेव्हा ते कामावर होते. त्यांची मुलगी रेशमाचे लग्न दोन महिन्यांनी होणार होते. तिच्या सासरच्यांनी लग्नाच्या खरेदीसाठी दिलेल्या पैशातून साड्या - दागिने खरेदी केले होते, तेही खाक झाल्याने आता सासरच्यांना काय सांगायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.