निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची प्रतीक्षा

By admin | Published: April 26, 2017 12:15 AM2017-04-26T00:15:46+5:302017-04-26T00:15:46+5:30

पनवेल महापालिकेचा रणसंग्राम शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षांनी इच्छुक उमेदवारांना तयारी करण्याचे आदेश दिले आहे. रायगड जिल्ह्यातील

Waiting for election officials | निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची प्रतीक्षा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची प्रतीक्षा

Next

वैभव गायकर / पनवेल
पनवेल महापालिकेचा रणसंग्राम शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षांनी इच्छुक उमेदवारांना तयारी करण्याचे आदेश दिले आहे. रायगड जिल्ह्यातील ही पहिलीच महानगरपालिका असून, पहिल्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.
सर्व राजकीय पक्ष, अपक्ष, आघाड्यांमधून जवळजवळ ८०० उमेदवार निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. मात्र अद्याप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूकच झाली नसल्याने इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत. निवडणूक लढविण्यासाठी लागणाऱ्या जात पडताळणी प्रमाणपत्राची प्रक्रि या सुरू झाली नसल्याने आयत्या वेळेत सर्वांचीच दमछाक होण्याची शक्यता आहे.
पनवेल महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी पार पडणार आहे. याकरिता नामनिर्देशित पत्र दाखल करण्याची तारीख २९ एप्रिल ते ६ मे आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या घडीला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक होणे गरजेचे असताना अद्याप निवडणूक निर्णय अधिकारीच उपलब्ध नसल्याने इच्छुकांना पालिकेचे हेलपाटे मारावे लागत आहेत. विशेष म्हणजे इच्छुकांनी कोकण भवन याठिकाणाहून जात पडताळणीसाठी अर्ज प्राप्त केले आहेत. अर्जाच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची सही बंधनकारक असल्याने त्या सहीशिवाय पुढची प्रक्रि या होत नसते. विशेष म्हणजे निवडणूक लढविणारे अनेक उमेदवार महाराष्ट्राच्या विविध भागातून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सहीनंतर हा अर्ज उमेदवाराने जातीचा दाखला प्राप्त केलेल्या तहसीलमध्ये पडताळणीसाठी जात असतो. मात्र बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक राहिले असताना अद्याप निवडणूक निर्णय अधिकारीच नसल्याने अनेक इच्छुक उमेदवार हतबल झाले आहेत. कळंबोली प्रभाग क्र मांक ७ मधील इच्छुक उमेदवार चंद्रकांत राऊत हे अनेक दिवसांपासून पालिकेच्या निवडणूक कक्ष, कोकण भवन याठिकाणी खेटे मारीत आहेत. अर्ज प्राप्त करून अनेक दिवस झाले तरी सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी नेमला नसल्याने त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र हलविण्यास अडचण निर्माण होत आहे.
राऊत हे मूळचे कोल्हापूरचे असल्याने त्यांना ही प्रक्रि या पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरला जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत होणारा उशीर हा उमेदवारांना त्रासदायक असल्याने लवकरात लवकर निवडणूक निर्णय अधिकारी नेमला जावा, अशी त्यांची मागणी आहे.
एकीकडे युतीचे चित्र स्पष्ट होत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. तसेच पनवेल महानगर पालिकेच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने लवकरात लवकर निवडणूक निर्णय अधिकारी नेमणे गरजेचे आहे, अन्यथा जसजसे दिवस जवळ येतील तसतशी निवडणूक कक्षात इच्छुकांची मोठी गर्दी होणार आहे.

Web Title: Waiting for election officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.