शेतकऱ्यांना प्रतीक्षा भरपाईची, शासनाकडून निधी येण्यास विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 01:12 AM2019-12-23T01:12:38+5:302019-12-23T01:13:09+5:30
कर्जतमधील ८८३२ शेतकरी : शासनाकडून निधी येण्यास विलंब होत असल्याने नाराजी
कांता हाबळे
नेरळ : शासनाने २७ नोव्हेंबर २०१९ रोजी अवकाळी पावसाळ्यामुळे भातपिकाच्या नुकसानीबद्दल मदतीचा पहिला टप्पा म्हणून १६१२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा केली होती. मात्र त्यानंतर शेतीचे पंचनामे झालेल्या ८४३२ शेतकºयांना अद्याप शासनाची मदत मिळालेली नाही. २७ नोव्हेंबर रोजी राज्यात सरकार स्थापन नव्हते आणि त्या वेळी शेतकºयांना मदत झाली, पण सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
कर्जत तालुक्यातील २९४२ हेक्टर जमिनीवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यात तालुक्यातील १०,०४६ शेतकºयांच्या शेतातील भाताचे, नागली, वरी या पिकाचे नुकसान झाले होते. कर्जत तालुक्यातील सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात झालेल्या भातशेतीचे नुकसान सरत्या पावसाने केले. त्या नुकसानीबद्दल शासनाने हेक्टरी ८००० ची मदत जाहीर केली होती. त्यावेळी पंचनाम्यानुसार कर्जत तालुक्यात १०,०४६ शेतकºयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना महसूल विभागाकडून पहिल्या टप्प्यात २७ नोव्हेंबर २०१९ रोजी मदत देण्यात आली होती. त्यावेळी १,६१२ शेतकºयांना त्यांच्या शेतीच्या नुकसानीची मदत त्यांच्या बँक खात्यावर जमा केली गेली होती. त्यावेळी शासनाकडून ५८,१०, ३१३ एवढी रक्कम बँक खात्यात जमा केली होती. आता उर्वरित नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जत तालुक्यातील मदत पोहचली नसलेल्या उर्वरित ८४३२ नुकसानग्रस्त शेतकºयांना मदतीसाठी आवश्यक असलेली २ कोटी रकमेची मागणी कर्जत तहसील कार्यालयाने रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
शेतकºयांना शासनाने हेक्टरी ८००० रुपयांचे अनुदान मदतीनिधी देण्याचे निश्चित केले आहे. ज्यावेळी शासनाने नुकसान भरपाईची मदत जाहीर केली, त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी ती मदत जाहीर केली होती. पण ती मदत अपुरी असल्याची भावना शेतकºयांनी व्यक्त केली होती. परंतु नवीन सरकार सत्तेवर आल्यावर त्यात वाढ होईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. पण कर्जत तालुक्यातील ८० टक्के शेतकरी यांना हेक्टरी ८००० प्रमाणे जाहीर झालेली भरपाई मदत अद्याप पोहोचली नाही.
बळीराजा संकटात
च्२७ नोव्हेंबरनंतर उर्वरित शेतकºयांच्या बँक खात्यात लगेच नुकसानभरपाईची मदत दिली जाईल, असे कर्जत तहसील कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र २५ दिवसांचा कालावधी लोटला तरी शासनाची मदत काही नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा झाली नाही. यामुळे बळीराजा संकटात आला आहे.
पंचनामे झालेल्या सर्व शेतकºयांच्या आधार कार्ड, बँक डिटेल्स आणि सातबारा उतारा यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली आहे. आमच्या कार्यालयाकडून मदतीबद्दल कोणतीही कसर शिल्लक नाही. मात्र मदत प्राप्त झाल्यानंतर काही तासांत ती मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होऊ शकते असे नियोजन केले आहे.
- विक्रम देशमुख, तहसीलदार, कर्जत