कर्जत : तालुक्यात २४ जून २०१५ ला सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाला होता. यावेळी आसल ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्याला शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसून अनेक अडथळे शासकीय पातळीवर समोर केले जात आहेत. वडवली येथील मारु ती काशिनाथ तळपे या शेतकऱ्याने आता कोणाकडे हात पुढे करायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तळपे वडवली येथील मारु ती तलपे यांचे शेतात बांधलेले घराचे सिमेंट पत्रे उडून गेले होते आणि भिंती कोसळल्या होत्या. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात घराचे प्रचंड नुकसान झालेल्या जागेचा पंचनामा त्यावेळी माणगाव तलाठी सोंडकर यांनी केला होता. त्यावेळी शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन नेरळ मंडल अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु सरकारी निर्णय क्र .सीएलएस /२४८३६१- क ६२० /म ३, ३१ जानेवारी १९८३ नुसार त्या दिवशीचे किमान पर्जन्य ६५ मिमी पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. मात्र २४ जूनला पर्जन्य नोंदणीनुसार पावसाची नोंद ६३ मिमी असल्याने त्यांचा अर्ज निकाली काढून नुकसान भरपाई देता येणार नाही असे पत्र दिले आहे. त्यामुळे तळपे यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे. जून २०१५ मध्ये कर्जत तालुक्यात वादळी वाऱ्यात अनेक घरांचे नुकसान झाले होते. त्यासर्वांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. जोरदार पावसात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले होते. त्या सर्वांना भरपाई मिळालेली नसल्याने ते नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील वडवली येथील मारु ती तळपे यांचे घराचे नुकसान होऊन विटा, पत्रे, पाइप, तांदूळ, भांडी यांचे प्रचंड नुकसान झाले होते आणि त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले होते. महसूल खात्याकडे देण्यात आलेल्या पंचनामा अहवालात सुमारे १ लाख ४ हजार २००रु पयांचे नुकसान झाल्याचा अहवाल कर्जत तहसील कार्यालयात पाठविण्यात आला होता. परंतु पावसाची नोंद कमी असल्याचे दाखवून त्यांचा अर्ज निकाली काढण्यात आला आहे. याबाबत मारु ती तळपे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्जाद्वारे घराचे प्रचंड नुकसान होऊन काहीच भरपाई मिळालेली नाही. तरी अर्जाचा विचार करून थोड्या प्रमाणात का होईना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
By admin | Published: January 21, 2016 2:44 AM