पोस्टाची पेटी पत्रांच्या प्रतीक्षेत
By admin | Published: June 29, 2015 10:28 PM2015-06-29T22:28:41+5:302015-06-29T22:28:41+5:30
पूर्वी आपल्या प्रिय व्यक्तींना किंवा आप्तांना पत्र लिहिण्यासाठी खास वेळ काढला जायचा. त्या पत्रांतील अक्षरांमध्ये भावनेचा ओलावा, मायेची गुंफण असायची.
पनवेल : पूर्वी आपल्या प्रिय व्यक्तींना किंवा आप्तांना पत्र लिहिण्यासाठी खास वेळ काढला जायचा. त्या पत्रांतील अक्षरांमध्ये भावनेचा ओलावा, मायेची गुंफण असायची. आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ई-मेल, एसएमएस, फेसबुक, व्हॉट्सअॅपव्दारा क्षणात संदेश पोचवता येत आहे. त्यामुळे एकेकाळी संपर्कासाठी मदतीला येणारी पत्रे आता कालबाह्य होत आहेत. त्यामुळेच पोस्टाच्या पेट्या पत्रांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसते.
नवीन पनवेल येथील श्री संत साईबाबा विद्यामंदिराच्या समोरील मुख्य पोस्ट आॅफिसच्या गेटवर पोस्टाची चांगल्या अवस्थेतील पेटी आहे. मुख्य आॅफिसच्या गेटवर असल्यामुळे पेटीची ओळख असणारा लाल रंग शाबूत आहे. मात्र, आजूबाजूच्या हातगाड्यांमुळे अनेकदा ही पेटी दिसून येत नाही. तसेच या पेटीमध्ये पत्र टाकण्यापेक्षा नोकरीसाठी पाठवण्यात येणारे अर्ज मोठ्या प्रमाणात टाकले जातात. पोस्ट आॅफिस जवळच असल्याने या पेटीचा वापर करण्यास नागरिक टाळाटाळ करतात.
पनवेल परिसरात काही ठिकाणी पोस्टपेटी बसवण्यात आल्या आहेत. मात्र, फेसबुक, व्हॉट्सअॅप, एसएमएस यांच्या जमान्यात या पोस्टपेटीचा वापर केला जात नाही. काही वर्षांपूर्वी शिक्षणासाठी कुटुंबापासून दूर आलेले विद्यार्थी आपल्या पालकांशी पत्राद्वारे संपर्कसाधत. मात्र, आता तरुणाई या पोस्टपेटीसोबत फोटो काढणे पसंत करत आहे. (वार्ताहर)
ओळखीचा लाल रंग उडाला : लाल रंग ही पोस्टाच्या पेटीची ओळख. शहरात असणाऱ्या पोस्टपेटीचा हा रंग उडाला आहे. या पेट्या बऱ्याच दिवसांपासून उघडल्या जात नसल्याचे येथील व्यावसायिक सांगतात. अगदी रस्त्यावर असणारी ही पेटी नागरिकांसाठी सोयीस्कर आहे. मात्र, पोस्टाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्याचा लाभ नागरिकांना होत नाही.
पोस्ट आॅफिस ओस : सध्या आमच्याकडे महिन्यातून एखादे पोस्टकार्ड येत असते. आता सरकारी कागदपत्रे, मुक्त विद्यापीठाची पुस्तके, एलआयसी कागदपत्रे, मनिआॅर्डर, रजिस्टर पत्र, स्पीड पोस्ट यांचे वाटप जास्त करावे लागते. आमच्या कामाचे स्वरूप बदलत असले, तरी कामाचा लोड कायम असल्याचे पोस्टमन सांगतात. पनवेल शहरातील जुने पोस्ट आॅफिस, खारघर पोस्ट आॅफिस, मुख्य पोस्ट आॅफिस, कामोठे व कळंबोली पोस्ट आॅफिस हे महत्त्वाचे पोस्ट आॅफिस आहेत. पोस्टपेटीमध्ये टपाल येत असले, तरी त्यामध्ये आता पत्रे कमी झाली आहेत.