पनवेलकर आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदानाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: January 29, 2017 02:19 AM2017-01-29T02:19:53+5:302017-01-29T02:19:53+5:30
नवीन पनवेल सेक्टर ११ मधील राजीव गांधी मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉलचे मैदान होणार असल्याची घोषणा दीड वर्षापूर्वी करण्यात आली होती. मात्र अद्यापपर्यंत गांधी
- मयूर तांबडे, पनवेल
नवीन पनवेल सेक्टर ११ मधील राजीव गांधी मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉलचे मैदान होणार असल्याची घोषणा दीड वर्षापूर्वी करण्यात आली होती. मात्र अद्यापपर्यंत गांधी मैदानावर कोणत्याही प्रकारच्या कामाला सुरुवात करण्यात न आल्याने फुटबॉलचे हे मैदान होणार की नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
सिडकोने वसवलेल्या नवीन पनवेल शहरात फुटबॉलचे एकही सुसज्ज मैदान नाही. त्यामुळे सेक्टर ११ येथील राजीव गांधी हे मैदान विकसित करावे, यासाठी राजकीय पक्षांनी सिडकोवर मोर्चे काढून निवेदन दिले होते. मात्र अद्यापही मैदानाकडे सिडकोचे दुर्लक्ष होत आहे.
त्यामुळे सेक्टर ११ मध्ये असणारे मैदान योग्यरीत्या विकसित करण्यात यावे, अशी मागणी रहिवासी करत आहेत.
क्र ीडांगणाबाबतची सिडको प्रशासनाची उदासीनता नेहमीच पहायला मिळते. नवीन पनवेलमधील राजीव गांधी मैदानाचे लोकार्पण झाल्यापासून अवघ्या काही वर्षांत अतिक्रमणांनी घेरले आहे. मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉलचे मैदान होणार असल्याची घोषणा झाली होती. त्यामुळे येथील रहिवासी तसेच फुटबॉलप्रेमींना आनंद झाला होता. मात्र काहीच दिवसात या आनंदावर विरजण पडले. दीड -दोन वर्षे होऊनही सिडकोने क्रीडांगणाच्या कामाला सुरुवात केली नाही. अद्यापपर्यंत मैदानाच्या कामासाठी एक वीटही रचली गेलेली नाही. त्यामुळे या फुटबॉल मैदानाला सिडकोे ठेंगा दाखवीत असल्याची चर्चा सुरू आहे.
मैदानाजवळील फुटपाथवर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे, तर आजूबाजूच्या फुटपाथवर अपघात झालेल्या काही गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत सायंकाळच्या वेळात मैदानात मद्यपींचा हैदोस असतो. क्रीडांगणावर ठिकठिकाणी दगड, माती, डेब्रिजचा ढीग दिसतात. याशिवाय मैदानावर वर्षभर धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्र मांची, तसेच क्रि केटचे सामने मोठ्या प्रमाणावर सुरू असतात. मैदान उभारण्यात आल्यापासून सातत्याने अतिक्रमणाच्या, सार्वजनिक तसेच राजकीय कार्यक्र मांच्या विळख्यात सापडले आहे. मैदानाचे कठडे तुटले आहेत. मैदानात दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहने सर्रास उभी केली जातात.
- आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदानासाठी २०० कोटी रु पये खर्च करण्यात येणार आहेत. यासाठी स्पेशल कन्सल्टंट ठेवण्यात येणार असल्याचे समजते. ५ हजार ५९४ चौरस मीटरचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉलचे मैदान बांधण्यात येणार आहे. मात्र त्याची काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. फुटबॉल खेळण्यासाठी थेट नवी मुंबई गाठावे लागत असल्याची प्रतिक्रि या फुटबॉलप्रेमींनी दिली.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या मैदानाची घोषणा होऊन दोन वर्षे होत आली तरी देखील सिडकोने कामाला सुरु वात केली नाही. राजीव गांधी मैदानात फुटबॉलच्या मैदानाच्या कामाची सुरु वात लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी सिडकोला निवेदन देण्यात आलेले आहे.
- समीर ठाकूर, नगरसेवक, पनवेल
फुटबॉलच्या मैदानाबाबत नियोजन झाले आहे. मात्र त्याची पुढे कार्यवाही झालेली नाही. लवकरच आराखडा तयार करण्यात येणार आहे.
- मोहन निनावे, जनसंपर्कअधिकारी, सिडको