पनवेलकरांना प्रतीक्षा पासपोर्ट कार्यालयाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 02:12 AM2019-12-02T02:12:47+5:302019-12-02T02:12:57+5:30

पनवेलमधील नियोजित पासपोर्ट कार्यालय संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी असणार आहे.

Waiting for Panvelkar's Passport Office | पनवेलकरांना प्रतीक्षा पासपोर्ट कार्यालयाची

पनवेलकरांना प्रतीक्षा पासपोर्ट कार्यालयाची

Next

- वैभव गायकर

पनवेल : पनवेलसह रायगड जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी आॅनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थेट ठाणे गाठावे लागते. पनवेल शहराची व्याप्ती पाहता मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडे स्वतंत्र पासपोर्ट कार्यालयाची मागणी केली होती. २०१७ मध्ये ही मागणी तत्कालीन केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंजूरही केली होती. मात्र, सध्याच्या घडीला जागेअभावी पनवेल पासपोर्ट कार्यालय लांबणीवर पडल्याचे चित्र आहे.
पनवेलमधील नियोजित पासपोर्ट कार्यालय संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी असणार आहे. वर्दळीसाठी सोयीचे असल्याने शहारात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले. मात्र, दोन वर्षे झाली तरी अद्याप पनवेल पासपोर्ट कार्यालय सुरू होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. नवीन पनवेल येथील टपाल आॅफिसमध्ये हे पासपोर्ट कार्यालय सुरू होणार होते. जागा निश्चित करण्यात आली होती. तसे पत्र पासपोर्टचे मुंबई क्षेत्रीय कार्यालयानेही पनवेलच्या पोस्ट कार्यालयाला पाठविले होते.
सध्याच्या परिस्थितीनुसार टपाल कार्यालयाने जागेचे कारण दाखवत पासपोर्ट कार्यालयाला जागा देण्यास नकार दिल्याचे समजते. त्यामुळे पनवेलमध्ये पासपोर्ट कार्यालय नेमके होणार तरी कुठे? असा प्रश्न पनवेलसह रायगड जिल्ह्यातील रहिवाशांना पडला आहे. जागेअभावी कार्यालय सुरू होण्यास उशीर लागत असल्याने सिडको किंवा महापालिकेशी समन्वय साधून हा विषय सोडविण्याची गरज आहे. रायगड जिल्ह्यातून सध्याच्या घडीला पनवेल शहरातून सर्वात जास्त आवेदन पासपोर्ट कार्यालयाला प्राप्त होत आहेत. संबंधित विषयासंदर्भात क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी मुंबई स्वाती कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Web Title: Waiting for Panvelkar's Passport Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.