रिक्षांनी अडवली प्रवाशांची वाट, कारवाईकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 01:56 AM2019-06-25T01:56:53+5:302019-06-25T01:57:06+5:30

नवी मुंबई शहरातील बहुतांश रेल्वेस्थानकांच्या बाहेरची मोकळी जागा रिक्षाचालकांनी बळकावली आहे. त्याठिकाणी अवैध थांबे तयार झाले असून, त्यामाध्यमातून प्रवाशांची वाट अडवली जात आहे.

Waiting for passengers to stop the train, ignore the action | रिक्षांनी अडवली प्रवाशांची वाट, कारवाईकडे दुर्लक्ष

रिक्षांनी अडवली प्रवाशांची वाट, कारवाईकडे दुर्लक्ष

Next

 - सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - शहरातील बहुतांश रेल्वेस्थानकांच्या बाहेरची मोकळी जागा रिक्षाचालकांनी बळकावली आहे. त्याठिकाणी अवैध थांबे तयार झाले असून, त्यामाध्यमातून प्रवाशांची वाट अडवली जात आहे. तर भाडे मिळवण्याच्या प्रयत्नात प्रवाशांसोबतच अरेरावी होत असतानाही, आरटीओसह वाहतूक पोलिसांकडून ठोस कारवाईकडे डोळेझाक होत आहे.

नवी मुंबईचा विकास करताना रेल्वेस्थानकांभोवतीच्या जागेचे भविष्याच्या दृष्टिकोनातून नियोजन होणे अपेक्षित असतानाही तसे झालेले नाही. यामुळे शहरातील बहुतांश रेल्वेस्थानकांच्या बाहेर वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. त्यात रिक्षांनी अधिकच भर टाकलेली आहे. त्यामध्ये ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, वाशी, नेरुळ तसेच सीबीडी या स्थानकांभोवतीच्या परिसराचा समावेश आहे. रेल्वे प्रवाशांना चालण्यासाठी असलेल्या जागेत देखील रिक्षांची घुसखोरी झालेली आहे. यामुळे रेल्वेस्थानकांच्या प्रवेशद्वारावरच प्रवाशांची अडवणूक होत आहे. मागील काही वर्षात शहरातील रिक्षांच्या संख्येत दुपटीने वाढ झालेली आहे. त्यामुळे अधिकृतरीत्या दिलेल्या थांब्यावर जागा अपुरी पडत असल्याने त्यांनी रस्त्यांवरच थांबे तयार केले आहेत.

मोकळी जागा मिळेल त्याठिकाणी रिक्षा थांबवून स्थानकातून प्रवासी बाहेर पडताच त्यांना स्वत:च्याच रिक्षात बसवण्याचा प्रयत्न होत असतो. या प्रकारात रिक्षाचालकांचे आपसात अथवा प्रवाशांसोबत वाद होण्याचेही प्रकार घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये रिक्षाचालकांची दहशत निर्माण झाली आहे. मुजोरी करणाऱ्या रिक्षाचालकांमध्ये बहुतांश बोगस रिक्षांवरील चालकांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून मर्जीच्या मार्गावरचेच भाडे स्वीकारणे, जवळचे भाडे नाकारणे, मीटरप्रमाणे येण्यास नाकारणे असे प्रकार सुरूच असतात. मात्र त्यांच्याविरोधात तक्रार करून देखील आरटीओ तसेच वाहतूक पोलिसांकडून कारवाईला टाळाटाळ केली जात आहे. परिणामी प्रशासनच आपल्या खिशात असल्याची उर्मट भाषा रिक्षाचालकांकडून प्रवाशांसोबत केली जात आहे.

नेरुळ रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूस हेच चित्र पाहायला मिळत आहे. यासंदर्भात अनेकांनी सातत्याने तक्रारी करून देखील तिथल्या रिक्षाचालकांच्या मुजोरीला लगाम घालण्यास आरटीओ तसेच वाहतूक पोलीस अपयशी ठरले आहेत. यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होत असून वाहतूककोंडीची देखील समस्या भेडसावत आहे. तर वाशी रेल्वेस्थानकाबाहेर रिक्षा थांब्यासाठी पुरेसी जागा दिलेली असतानाही त्याठिकाणी रस्त्यावरच रिक्षा उभ्या करून प्रवासी मिळवण्याच्या प्रयत्नात रहदारीला अडथळा निर्माण केला जात आहे.

घणसोली रेल्वेस्थानकाबाहेर देखील थांबा असतानाही, रस्त्यावरच रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जात आहे. यामुळे त्याठिकाणी वाहतूककोंडी उद्भवत असून दोन गटांत हाणामारीचे देखील प्रकार घडले आहेत. ऐरोली रेल्वेस्थानकाच्या पूर्व पश्चिम दोन्ही भागात हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

तुर्भे रेल्वेस्थानकाच्या ठाणे-बेलापूर मार्गाकडील बाजूला पदपथांवर रिक्षाचे थांबे तयार करण्यात आले आहेत. तसेच बेशिस्तपणे रस्त्यावर रिक्षा चालवल्या जात आहेत. यामुळे वाहतूककोंडी होत असून छोट्या-मोठ्या अपघाताच्या देखील घटना घडत आहेत. यानंतरही तिथल्या परिस्थितीकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

रिक्षाचालकांच्या मुजोरीला लगाम घालून रेल्वेस्थानकांच्या बाहेरचे रस्ते रहदारीला मोकळे करणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षे त्याकडे दुर्लक्ष होत गेल्यास त्याठिकाणची जागा रिक्षा थांब्यासाठी बळकावली जावू शकते. त्यामुळे भविष्यात असे थांबे हटवायचे झाल्यास संघटनांच्या विरोधाला सामोरे जायला लागू शकते.

नेरुळ रेल्वेस्थानकाबाहेर रिक्षाचालकांकडून प्रवाशांची वाट अडवली जात आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच रिक्षा आडव्या लावून प्रवासी मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. असाच प्रकार शहरातील सर्वच रेल्वेस्थानकांच्या बाहेर पाहायला मिळत आहे. यानंतरही आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडे कारवाईकडे होणारे दुर्लक्ष संशयास्पद आहे.
- हरेश भोईर, नागरिक

Web Title: Waiting for passengers to stop the train, ignore the action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.