राज्य विमा महामंडळाच्या स्वतंत्र रुग्णालयाची कामगारांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:22 PM2018-10-23T23:22:12+5:302018-10-23T23:22:16+5:30
लाखो कामगारांना उपचारासाठी खासगी व शहराबाहेरील कामगार राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे.
- वैभव गायकर
पनवेल : रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांचे कामकाज हाकणाऱ्या कामगार राज्य विमा महामंडळाच्या पनवेल शाखेचे स्वतंत्र रुग्णालय नसल्याने लाखो कामगारांना उपचारासाठी खासगी व शहराबाहेरील कामगार राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. रायगड जिल्ह्यातील कामगार राज्य विमा महामंडळात १५ तालुक्यांमध्ये सुमारे ३६२५ नोंदणी करण्यात आलेल्या कंपन्या असून, या कंपन्यांची कामगार संख्या एक लाख ७२ हजार एवढी आहे.
कामगारांच्या आरोग्य तसेच विविध सुविधा संदर्भात हे विमा महामंडळ कामगारांना सुविधा पुरवीत असते. याकरिता कामगार कार्यरत असलेल्या कंपनीने विमा महामंडळात आपली नोंदणी करणे गरजेचे असते. कामगार आजारी पडल्यास त्याला वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी कामगार राज्य विमा महामंडळ उचलत असते. अपघातात कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांनाही आर्थिक मोबदला देण्यात येतो.
कामगारांची संख्या लाखोंच्या घरात असताना अद्याप रायगड जिल्ह्यासाठी स्वतंत्र रुग्णालय नसल्याने कामगारांची गैरसोय होत आहे. खासगी रुग्णालयात कामगार राज्य विमा महामंडळाने या कामगारांसाठी जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत. मात्र, खासगी रुग्णालय अशा कामगारांना वेगळी वागणूक देते, अशा वेळी स्वतंत्र कामगार रुग्णालयांचा विषय पुढे आला आहे. तसेच कामगारांची पिळवणूक करणाºया रुग्णालयावर कारवाईची मागणी कामगारवर्ग करीत आहे.कामगार राज्य विमा महामंडळाच्या मार्फत सध्याच्या घडीला वरळी, ठाणे, कांदिवली, मुलुंड, उल्हासनगर, वाशी आदी ठिकाणी रु ग्णालय आहेत. या शहराच्या तुलनेत रायगड जिल्ह्याची व्याप्तीही मोठी आहे. तरीदेखील अद्याप या जिल्ह्यासाठी कामगारांना स्वतंत्र अशी वैद्यकीय सेवा देणारे रु ग्णालय सुरू झालेले नाही. कर्मचाºयांच्या वर्गणीतून कंपन्या संबंधित विमा महामंडळात पैसे भरत असतात. मात्र, विमा महामंडळाचे स्वतंत्र रु ग्णालय नाही आणि खासगी रुग्णालयाचे आडमुठे धोरण यामुळे कामगारवर्ग विमा महामंडळाच्या सुविधेस पात्र ठरत नाही.
>विमा महामंडळात कोण करू शकतो नोंदणी?
ज्या कंपनीमध्ये दहा कामगार कार्यरत आहेत, त्यांना कामगार राज्य विमा महामंडळात कामगारांची नोंदणी करणे अनिवार्य आहे. यामध्ये हॉटेल्स व्यावसायिकांचाही समावेश आहे. मात्र, अनेक कंपन्या याकरिता टाळाटाळ करत असल्याचे पाहावयास मिळते.
>कामगारांच्या संख्येनुसार हवीत रुग्णालये
कामगार राज्य विमा महामंडळाच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यात एकूण एक लाख ७१ हजार कामगार आहेत, आकडा वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, रायगड जिल्ह्याची व्याप्ती पाहता, जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वतंत्र कामगार रु ग्णालय स्थापनेची गरज आहे.
>कामगार राज्य विमा महामंडळाचे स्वतंत्र रुग्णालय असणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न प्रादेशिक कार्यालयाकडे सुरू आहेत. कामगारांच्या सुविधा गरजा संदर्भात काही अडचणी असल्यास त्या सोडविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
- डी. एन. दिनकर,
शाखा व्यवस्थापक, कामगार राज्य विमा महामंडळ, पनवेल