शौचालयपाडण्यासाठी जाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2016 04:16 AM2016-04-06T04:16:01+5:302016-04-06T04:16:01+5:30
पोलादपूर तालुक्यांतील दिवील कुंभारवाडी येथील वाळीतग्रस्त प्रियंका देवे यांनी राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत स्वदेस फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने बांधले
जयंत धुळप , अलिबाग
पोलादपूर तालुक्यांतील दिवील कुंभारवाडी येथील वाळीतग्रस्त प्रियंका देवे यांनी राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत स्वदेस फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने बांधलेले व्यक्तिगत स्वच्छतागृह सामाजिक बहिष्कार असल्याने ते पाडून टाकण्याकरिता त्यांना पुन्हा जाच करण्यास प्रारंभ करण्यात आला. या जाचाला कंटाळून हे शौचालय पाडून टाकल्यावर आपल्या कुटुंबावरील सामाजिक बहिष्कार मागे घेण्यात येईल, या अपेक्षेने देवे कुटुंबाने नव्यानेच बांधलेले हे शौचालय अखेर पाडून टाकले. यानिमित्ताने राष्ट्रीय स्वच्छता अभियानास देखील आता सामाजिक बहिष्काराचे ग्रहण लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलादपूर तालुक्यातील दिवील कुंभारवाडी येथील रहिवासी असणाऱ्या प्रियंका देवे यांच्या पुतण्याने केलेल्या विवाहास गावकीने आक्षेप घेतला. त्याच मुद्द्यावरून देवे कुटुंबास गावातील काही राजकीय व्यक्तींच्या सांगण्यावरून वाळीत टाकून सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत केले आहे. गुन्हा दाखल झालेले २३ जणांना जामिनावर सोडण्यात आले. जामिनावर सुटून आल्यानंतर त्यांनी आम्हाला सातत्याने विविध कारणांनी जाच करण्यास सुरुवात केली असल्याचे प्रियंका देवे यांनी सांगितले. आमच्या घरासमोर पिढ्यान्पिढ्याच्या वहिवाटीच्या जागेत दोन शौचालये बांधली. यामुळे माझे पती प्रकाश देवे यांची रिक्षा घरापर्यंत येऊ शकत नाही. या संदर्भात सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे दाद मागितली असता त्यांनी स्वदेस फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने बांधलेले शौचालय तोडण्याची अट घातली. शौचालयाचे बांधकाम आम्ही तोडले. मात्र तरीही आमची अडवणूक करण्याच्या हेतूने त्यांनी बांधलेले शौचालय तोडले नसल्याचे प्रियंका देवे यांनी सांगितले.