‘वॉक वुईथ कमिशनर’चा करिष्मा ओसरला

By admin | Published: January 31, 2017 03:48 AM2017-01-31T03:48:21+5:302017-01-31T03:48:21+5:30

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रमाचा करिष्मा ओसरला आहे. नेरूळमध्ये झालेल्या उपक्रमामध्ये फक्त २२ जणांनी तक्रारी सादर केल्या

'Walk Weith Commissioner' has lost his charisma | ‘वॉक वुईथ कमिशनर’चा करिष्मा ओसरला

‘वॉक वुईथ कमिशनर’चा करिष्मा ओसरला

Next

- नामदेव मोरे,  नवी मुंबई
पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रमाचा करिष्मा ओसरला आहे. नेरूळमध्ये झालेल्या उपक्रमामध्ये फक्त २२ जणांनी तक्रारी सादर केल्या आहेत. नागरिकांपेक्षा पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा रक्षकांची संख्याच जास्त असल्याचे निदर्शनास आले. पण प्रशासनाने मात्र नागरिकांचा उत्साही प्रतिसाद मिळाल्याचे सांगत अपयशावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या तुकाराम मुंढे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या कार्यशैलीविषयी प्रचंड उत्सुकता होती. नागरिकांशी संवाद साधण्यासाठी २९ मे रोजी सीबीडीमध्ये वॉक वुईथ कमिशनर उपक्रम सुरू केला. त्यास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
सुरवातीला काही महिने या उपक्रमाचे स्वागत झाले. नागरिक गटारावरील उघड्या झाकणांपासून ते अतिक्रमणापर्यंत अनेक प्रश्न घेवून या उपक्रमास सकाळी हजर होवू लागले होते. सकाळी साडेसहा वाजता शहरातील एका उद्यानामध्ये आयुक्त नागरिकांना भेटतात. प्रथम नागरिकांसोबत पूर्ण उद्यानामध्ये एक फेरी मारली जाते. नंतर तयार केलेल्या व्यासपीठावर उभे राहून आयुक्त नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत. अतिक्रमण व इतर काही तक्रारी असल्यास तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात यायचे. एखादी तक्रारी योग्य नसेल तर संबंधितांना धोरवर धरले जात असे. सुरवातीला आयुक्तांच्या स्पष्टवक्तेपणाचे सर्वांनाच कौतुक होते. पण नंतर वॉक वुईथ कमिशनरमध्ये संवाद थांबला व आयुक्तांच्या आदेशालाच महत्त्व प्राप्त झाल्याने नागरिकांचा उत्साह सुद्धा मावळला. तक्रारींचे प्रमाण कमी झाले. केलेल्या तक्रारींवर योग्य कार्यवाही होईना झाली. यामुळे या उपक्रमाला गांभीर्यच उरले नाही. आयुक्त येतच आहेत तर काही तक्रारी देवून टाकू या अशी औपचारिकता शिल्लक राहिली.
नेरूळ सेक्टर १९ मधील वॉक वुईथ कमिशनर उपक्रमामध्ये फक्त २२ नागरिकांनी त्यांचे अर्ज सादर केले आहेत. वास्तविक चौथा शनिवार असल्याने महापालिकेला सुटी असते. सुटीवर पाणी सोडून शहर अभियंता ते विभाग अधिकारी, सफाई कामगार ते सुरक्षा रक्षकांपर्यंत पालिकेचे कर्मचारी सकाळी साडेसहा वाजता हजर राहिले होते. पोलिसांचा बंदोबस्त कमी झाल्याने यावेळी बोर्डाच्या सुरक्षा रक्षकांना तैनात केले होते.
पालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांएवढे तक्रारदार नसल्याने आयुक्तांचा करिष्मा ओसरल्याची चर्चा आहे. या उपक्रमात नागरिकांचे मत ऐकण्याऐवजी आयुक्तांचीच भाषणबाजी ऐकावी लागत असल्याने नागरिक उपक्रमाकडे फिरकत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

पारदर्शकता नाही
‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रम पूर्णपणे अपयशी ठरला आहे. या उपक्रमासाठी पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. सुटीच्या दिवशीही सकाळी साडेसहा वाजता बोलावले जात आहे. २९ मेपासून आलेले अर्ज व केलेली कार्यवाही याविषयी सर्व तपशील नागरिकांना पाहण्यासाठी खुला केला तर हा उपक्रम यशस्वी झाला की अपयशी ते स्पष्ट होईल असे मत व्यक्त केले जात आहे. सगळी यंत्रणा वेठीस धरण्यापेक्षा नियमितपणे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण होईल अशी कायमस्वरूपी यंत्रणा तयार करण्याची मागणीही होवू लागली आहे.

Web Title: 'Walk Weith Commissioner' has lost his charisma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.