धोकादायक इमारतीची भिंत कोसळली; ‘नैना’ क्षेत्रातील पुनर्बांधणीचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:32 AM2020-02-08T00:32:01+5:302020-02-08T00:32:28+5:30
सुकापूरमधील रहिवाशांचा जीव टांगणीला
पनवेल : ‘नैना’ क्षेत्रातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुकापूर येथील युगांतक कॉम्प्लेक्समधील अवंतिका सोसायटीतील एच २ या इमारतीची भिंत गुरुवारी रात्री ६.३०च्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, घटनेनंतर ‘नैना’ क्षेत्रातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
१९९४ मध्ये उभारण्यात आलेली ही इमारत सुकापूर ग्रामपंचायतीने धोकादायक घोषित केली आहे. एच २ व एच ३ अशा दोन इमारती या कॉम्प्लेक्समध्ये आहेत. त्यापैकी एच २ मधील दुसºया माळ्यावरील भिंत कोसळली. इमारतीत एकूण १२ फ्लॅट आहेत. संबंधित इमारत जीर्ण झाल्याने येथील रहिवासी स्थलांतरित झाले आहेत. मात्र, अद्यापही कॉम्पलेक्सच्या एच ३ या बिल्डिंगमध्ये २४ फ्लॅटधारक वास्तव्य करीत आहेत.
ग्रामपंचायत दरवर्षी धोकादायक घरे खाली करण्याच्या नोटीस बजावते. मात्र, घरे खाली करून जाणार कुठे? असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. ‘नैना’ क्षेत्रातील जाचक अटी, केवळ एकाच चटईक्षेत्रामुळे या इमारतींच्या पुनर्बांधणीला विकासक पुढे येत नसल्याने रहिवासी द्विधा मनस्थितीत आहेत. सिडकोने धोकादायक इमारतीसंदर्भात धोरण निश्चित करण्याची गरज असल्याचे मत येथील रहिवासी पराग कदम यांनी व्यक्त केले. अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही पदरी निराशाच पडत असल्याची प्रतिक्रिया कदम यांनी दिली.
१०० पेक्षा जास्त इमारती धोकादायक : सिडकोचे ‘नैना’ क्षेत्र खूप मोठे आहे. या क्षेत्रात १०० पेक्षा जास्त धोकादायक इमारतींचा समावेश आहे. जीर्ण इमारतीच्या पुनर्वसनाचे धोरण अद्याप स्पष्ट नसल्याने बहुसंख्य रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. सिडकोने पुनर्विकासाबाबत धोरण निश्चित न केल्यास भविष्यात धोकायदाक इमारतींचा प्रश्न आणखी गंभीर होऊ शकतो. यात जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.