पनवेल महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाच्या भिंतीला पाझर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 02:31 AM2019-08-14T02:31:26+5:302019-08-14T02:33:43+5:30
पनवेल महानगरपालिकेच्या स्वर्गीय विलासराव देशमुख शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गळती लागली आहे.
- वैभव गायकर
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या स्वर्गीय विलासराव देशमुख शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गळती लागली आहे. या दुमजली इमारतीत पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग ‘ड’ प्रभाग समितीच्या कार्यालयासह एलबीटी तसेच टपाल कार्यालय आहे. इमारतीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. भिंतीतून पाणी पाझरत असल्याने त्याचा फटका येथील कामकाजाला बसला आहे.
शहरातील अतिमहत्त्वाच्या कार्यालयापैकी हे व्यापारी संकुल आहे. नागरिकांची सततची वर्दळ या ठिकाणी असते. विशेष म्हणजे, प्रभाग अधिकाऱ्यांचे दालन असलेल्या भिंतीही पूर्णपणे ओल्याचिंब झाल्याने पालिकेचे या इमारतीकडे दुर्लक्ष झाले आहे. पनवेल शहरातील पोस्ट आॅफिस नवीन पनवेलला स्थलांतरित करण्यात आले होते. मागील वर्षभरापासून पोस्ट कार्यालय पनवेल शहरात स्थलांतर करण्याची मागणी केली जात होती. कफ सारख्या संघटनापासून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी हे कार्यालय शहरात स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न केले. आमदारापासून खासदारांनी याकरिता पोस्ट कार्यालयात बैठका घेतल्या. त्यानुसार दोन ते तीन महिन्यांपासून हे कार्यालय स्वर्गीय विलासराव देशमुख व्यापारी संकुलातील दोन गाळ्यात स्थलांतरित झाले. गाळा क्र मांक ११० आणि १११ या दोन गाळ्यांमध्ये पोस्टाचे कामकाज सुरू झाले आहे. मात्र, इमारतीला लागलेल्या गळतीमुळे या ठिकाणी काम करताना अडथळा निर्माण होत आहे. भिंतीतून पाणी झिरपत असल्याने शॉर्टसर्किटची भीती निर्माण झाली आहे. पोस्ट कार्यालयासह संकुलातील इतर गाळेधारकांकडून महापालिका दरमहा भाडे वसूल करते. त्यामुळे येथील समस्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारीही महापालिकेची असल्याचे येथील गाळेधारकांचे म्हणणे आहे. या इमारतीत बँक, दुकाने, तसेच पोस्ट कार्यालयामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. विशेष म्हणजे, या इमारतीच्या जिन्यावर सर्व गाळ्यांना वीजपुरवठा करणारी विद्युत यंत्रणा कार्यान्वित आहे. अशा परिस्थितीत भिंतीच्या माध्यमातून शॉर्ट सर्किट झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संबंधित व्यापारी संकुलात अनेक ठिकाणच्या भिंती ओलसर झाल्या आहेत. पालिकेच्या अभियंत्यांमार्फत या ठिकाणच्या कामाची पाहणीही करण्यात आली असून लवकरच गळती थांबविण्याचे काम सुरू होणार आहे.
- श्रीराम हजारे,
अधिकारी, प्रभाग ‘ड’ समिती, पनवेल महानगरपालिका
या कार्यालयांचा समावेश
स्वर्गीय विलासराव देशमुख व्यापारी संकुलात प्रभाग कार्यालयासह पोस्ट आॅफिस, एलबीटी कार्यालय, बाकी दुकानांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, शहरातील पोस्ट आॅफिस या ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करण्यात आला होता.