नवी मुंबई : एपीएमसीमधील भाजी मार्केटच्या ओपन शेडच्या बांधकामाचा भाग ढासळल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. नेमके कामगार त्या ठिकाणी जमा होत असतानाच हा प्रकार घडला. यामध्ये दोघे जण थोडक्यात बचावले असून, भविष्यातही त्या ठिकाणी दुर्घटनेची शक्यता वर्तवली जात आहे.बिगर गाळाधारकांना व्यापार करण्यासाठी भाजी मार्केटच्या ओपन शेडमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. यानुसार सद्यस्थितीला त्या ठिकाणी टोमॅटोचा व्यापार केला जातो. त्याकरिता पहाटे ३ वाजल्यापासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत त्या ठिकाणी व्यापारी, माथाडी कामगार यांच्यासह इतर घटकाची वर्दळ सुरू असते. मात्र, तिथल्या मार्केटच्या जीर्ण झालेल्या बांधकामामुळे २०० हून अधिक जणांच्या जीविताला धोका उद्भवत आहे. त्यानुसार बुधवारी पहाटे दोन कामगार थोडक्यात बचावले आहेत. बुधवारी पहाटे १५७ क्रमांकाच्या टोळीचे कामगार त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे जमले होते. नेमके त्याच वेळी मार्केटच्या भिंतीचा मोठा भाग ढासळला. यामुळे बांधकामाचे बीम उघड्यावर पडले असून, त्यामधील सळ्या दिसून येत आहेत. ज्या ठिकाणी बांधकामाचा भाग पडला, त्याच जागी कामगार जमलेले असतात. तर घटनेच्या काही मिनिटे अगोदरच त्या ठिकाणी झोपलेले कामगार उठले होते. यामुळे थोडक्यात त्यांच्यावरील संकट टळले. मात्र, या घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे कामगार संपत घोलप यांनी सांगितले.मार्केटचे बांधकाम जुने असल्याने शिवाय त्याची देखभाल दुरुस्ती झालेली नसल्याने भिंती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे भिंतींची पडझड सुरू आहे. अशातच शेडच्या पत्र्याचा आधारही याच भिंतींना देण्यात आलेला आहे. त्यामुळे एखादा आधार निखळल्यास पत्र्याचे शेड कोसळून त्याखालील कामगारांचे जीव धोक्यात येऊ शकतात याचीही भीती संपत घोलप यांनी व्यक्त केली आहे; परंतु प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने व्यापाऱ्यांसह कामगारांची सुरक्षा वाºयावर असल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
एपीएमसीमधील भाजी मार्केटच्या भिंतीचा जीर्ण भाग कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 1:45 AM