नवी मुंबई : ‘फिफा’च्या निमित्ताने आलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे पाकीट हरवले होते. ते पाकीट एका तरुणाला सापडले असता, त्याने संबंधित खेळाडूला ते परत करून अतिथी देवोभव या बोधवाक्याला शोभनीय काम केले आहे.बुधवारी एपीएमसी आवारात हा प्रकार घडला होता. त्या ठिकाणच्या फॉर्च्युन हॉटेलमध्ये ‘फिफा’मध्ये सहभागी असलेल्या संघाचे खेळाडू मुक्कामी आहेत. त्यापैकी काही खेळाडू बुधवारी सामने नसल्यामुळे शॉपिंगच्या बहाण्याने परिसरात फिरत होते. या वेळी एका खेळाडूचे पाकीट त्याठिकाणच्या दुकानाबाहेर पडले होते. हे पाकीट त्या मार्गाने चाललेल्या शिळफाटा येथील तरुणाच्या निदर्शनास आले. त्यामध्ये विदेशी चलनासह काही कार्डही होती. मात्र, ते पाकीट नेमके कोणाचे हे त्याला कळू शकले नाही. त्याने एका दुकानदाराला पाकिटासंदर्भात माहिती देऊन, कोणी चौकशीसाठी आल्यास आपल्याला संपर्क साधण्यास सांगितले.दरम्यान मुक्कामी हॉटेलवर गेल्यानंतर पाकीट हरवले असल्याचे सदर खेळाडूच्या लक्षात आले. यामुळे शॉपिंगच्या निमित्ताने गेलेल्या ठिकाणी पुन्हा जाऊन त्याने चौकशी केली असता, दुकानदाराने त्या तरुणाचा मोबाइल नंबर दिला. अखेर त्यांच्यात झालेल्या संभाषणानंतर सापडलेले ते पाकीट आंतरराष्टÑीय फुटबॉलपटूचे असल्याचे तरुणाला समजले. यानुसार त्याने पोलिसांसमक्ष सापडलेले पाकीट परत केले. त्याच्या या प्रमाणिकपणाबद्दल सदर खेळाडू व पोलिसांकडूनही त्याचे आभार मानण्यात आले.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे सापडलेले पाकीट केले परत , एपीएमसी आवारात पडले होते पाकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 2:28 AM