वंडर्स पार्कचे विदु्रपीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2016 02:57 AM2016-02-07T02:57:55+5:302016-02-07T02:57:55+5:30
महापालिकेने वंडर्स पार्क लग्नसोहळ्यासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतल्याने उद्यानाला लग्नाच्या हॉलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लग्न, इतर कार्यक्रमांसाठी जेवणाची आॅर्डर फूड
नवी मुंबई : महापालिकेने वंडर्स पार्क लग्नसोहळ्यासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतल्याने उद्यानाला लग्नाच्या हॉलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लग्न, इतर कार्यक्रमांसाठी जेवणाची आॅर्डर फूड कोर्ट चालकालाच देण्याची सक्ती करण्यात आली आहे. उद्यानात येणाऱ्यांकडून खाद्यपदार्थांचे जादा पैसे उकळणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी प्रशासन त्याचीच पाठराखण करीत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे.
नेरूळ सेक्टर १९ मधील महापालिकेच्या वंडर्स पार्कमधील फूडकोर्ट चालकाच्या मनमानीविषयी वृत्त प्रसिद्ध करताच ठेकेदारांना पाठीशी घालणारांचे धाबेही दणाणले आहे. नागरिकांनी मात्र या वृत्ताचे स्वागत केले असून, येथील गैरसोयीविषयी आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. रोज सकाळी शेकडो नागरिक मॉर्निंग वॉकसाठी उद्यानामध्ये जातात. प्रदूषणविरहित जॉगिंग ट्रॅक असल्याने अनेक सरकारी अधिकारी, नगरसेवकही सकाळी या ठिकाणी येत असतात. लग्नसोहळ्याच्या दोन दिवस अगोदर मंडप उभारण्यास सुरुवात होती. सोहळा झाल्यानंतर पुढील दोन दिवस सर्व साहित्य येथील लॉनवर पडलेले असते. तलाव व इतर ठिकाणीही कचऱ्याचे ढीग दिसतात. शिल्लक राहिलेले खाद्यपदार्थ अनेक ठिकाणी पडलेले असतात. सकाळी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड दुर्गंधीला सामोरे जावे लागते. पोलीस व महापालिकेच्याही अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी याची छायाचित्रे काढली असून, ती आज ‘लोकमत’कडे पाठविली आहेत. शहरातील लँडमार्क असणाऱ्या या उद्यानाचे विद्रुपीकरण थांबवा, अशी प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केली आहे.
वंडर्स पार्कमधील लॉन लग्न, वाढदिवस व इतर कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला होता. परंतु या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना जेवण व इतर खाद्यपदार्थांची आॅर्डर फूडकोर्ट चालकालाच दिली जाईल, अशाप्रकारची कोणतीही तरतूद केलेली नव्हती. शीतपेय व इतर वस्तंूवरील छापील किमतीपेक्षा १० ते १५ रुपये जास्त घेण्याची परवानगीही महापालिकेने दिलेली नाही. फूडकोर्टमध्ये खाद्यपदार्थ घेणाऱ्या नागरिकांना मागितले तरच बिल दिले जाते. या बिलावर व्हॅट व इतर टॅक्सचा कोणताही उल्लेख नसतो. या सर्व गोष्टींकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ठेकेदाराने येथे किचन शेड व फूडकोर्ट बनविण्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. वास्तविक येथे व्यवसाय होत नसल्याने त्यांनाही परवडत नाही. इतर शहरापेक्षा उद्यानामधील खाद्यपदार्थांचे दर कमीच असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी जास्त पैसे मोजले तरी हरकत नाही, परंतु ठेकेदाराचे हित जोपासले पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेतली जात असल्याने त्याविषयी नाराजी वाढू लागली आहे.
दरपत्रकाची
झाडाझडती सुरू
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन शहरातील काही महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींनी वंडर्स पार्कमध्ये जाऊन तेथील मेनू कार्डची पाहणी केली. दरपत्रक खरोखर जास्त आहे का याची माहिती घेण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाचेही धाबे दणाणले आहे. शिवसेना नगरसेवक स्थायी समिती व सर्वसाधारण सभेतही याविषयी आवाज उठविणार असून, त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.