उदरनिर्वाहासाठी ‘बादल’ची भटकंती! चित्रपट, मालिकांत काम केलेल्या नंदीबैलाची बीड-मुंबई वारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 01:04 PM2024-03-22T13:04:57+5:302024-03-22T13:05:58+5:30
दोन घरचे धान्य मिळावे या हेतूने मालक दिवसभर नंदीबैलाला घेऊत भटकंती करत असल्याचे समोर आले आहे.
अरुणकुमार मेहत्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, कळंबोली: ग्रामीण भागामध्ये गुबू-गुबू आणि नंदीबैलाचे आगमन म्हणजे एक शुभ संकेत मानला जातो. सध्या बादल नावाचा नंदीबैल मालकासोबत पनवेल तालुक्यातील कर्नाळा भागात भटकताना दिसून येत आहे. अजय देवगनच्या एका चित्रपटात मूक अभिनय करणारा बादल सध्या उदरनिर्वाहासाठी बीडहून मुंबईत आला आहे. दोन घरचे धान्य मिळावे या हेतूने मालक दिवसभर नंदीबैलाला घेऊत भटकंती करत असल्याचे समोर आले आहे.
पनवेल तालुक्यात बादल सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ८२ वर्षीय महादेव धोंडीबा गौंड हे बादलचे मालक असून त्यांची अनेक वर्षांपासून भटकंती सुरू आहे. गावोगावी फिरून मिळणाऱ्या पैशांतून नातवंडाचे शिक्षण पूर्ण करत आहे. बादलचे भव्य रूप पाहून त्याला धान्य, पैशांसह इतर वस्तू देण्यासाठी लाेक पुढे येतात, असे महादेव यांनी सांगितले.
मोठमोठे शिंग, खैराबांडा रंग, अंगावर झुला, गळ्यात घुंगरमाळा शिंगाला बेगड आदींने सजलेला बादल या नंदीबैलाने अनेक चित्रपट, मालिका व जाहिरातींमध्ये काम केले आहे. मात्र सध्या मालकासोबत उदरनिर्वाहासाठी पनवेल परिसरात घरोघरी जात आहे. (छाया : भालचंद्र जुमलेदार)
पेहरावाचे आकर्षण
- बीड येथील महादेव गौंड हे ८२ वर्षाचे आहेत.
- डोक्यावर फेटा, अंगामध्ये सदरा, खांद्यावर ओम नमः शिवायचा उल्लेख असणारी शाल, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, कपाळावर गंध, हातावर घड्याळ त्याचबरोबर काठी घेऊन महादेव बुवा संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालत आहेत.
अनेक मूक अभिनय
पनवेल कर्नाळा परिसरात घरोघरी जाणाऱ्या बादलने चित्रपटांमध्ये मूक अभिनय केले आहे. त्याचबरोबर जय मातादी, ओम नमः शिवाय या मालिकांमध्ये काम केलेले आहे.लहान मुलांकडून बादलला पाऊस पडेल का असे विचारलं तर मान हलवून होणार आणि नकार देतो. मोठमोठे शिंग, खैराबांडा रंग, अंगावर झुला, गळ्यात घुंगरमाळा शिंगाला बेगड अशा प्रकारचा सजलेला आणि धजलेला नंदीबैल अभिनयामध्ये खरोखर पारंगत आहे.