कर्जतच्या ग्रामीण भागात आजही पाण्यासाठी भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 01:22 AM2021-03-08T01:22:52+5:302021-03-08T01:22:58+5:30

शासनाची पाणी योजना अद्याप पोहोचलीच नाही; आदिवासींचे हाल

Wandering for water even today in the rural areas of Karjat | कर्जतच्या ग्रामीण भागात आजही पाण्यासाठी भटकंती

कर्जतच्या ग्रामीण भागात आजही पाण्यासाठी भटकंती

googlenewsNext
ठळक मुद्देकर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या आदिवासी वस्तीत सुमारे ३०  कुटुंब राहातात. १७५ लोकसंख्या असलेल्या या आदिवासी वस्तीवर आजतागायत पाण्याची एकही योजना यशस्वीपणे राबविण्यात आलेली नाही.

कांता हाबळे

नेरळ : कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या धाब्याचीवाडी या आदिवासी बांधवांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तेथील महिलांना पाण्यासाठी दिवसरात्र वणवण करावी लागत आहे. शासनाच्या पाणी योजना कुचकामी ठरत असल्याने मैलोन‌्मैल पायपीट करून महिलांना पिण्यासाठी पाणी आणावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. 

कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या आदिवासी वस्तीत सुमारे ३०  कुटुंब राहातात. १७५ लोकसंख्या असलेल्या या आदिवासी वस्तीवर आजतागायत पाण्याची एकही योजना यशस्वीपणे राबविण्यात आलेली नाही. काही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पाण्याच्या साठवण टाक्या बसविण्यात आल्या; मात्र त्याही पाणीच नसल्याने बिनकामाच्या ठरत आहेत. मात्र त्यांनी दिलेल्या पाणी वाहतुकीच्या फिरत्या ड्रममुळे महिलांचा डोईवरील भार खांद्यावर आला आहे. ड्रमच्या साहाय्याने दूरवरून पाणी आणणे काहीसे सोपे झाले आहे तरीही त्यांच्या नशिबाची पायपीट काही कमी झाली नाही. रात्र जागून पिण्यासाठी पाणी आणणे नित्याचेच  झाले आहे. केवळ मोलमजुरीवर आपली उपजीविका करणाऱ्या या आदिवासींना दिवसरात्र पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने त्यांना रोजगार बुडत असून, त्याचा परिणाम उदरनिर्वाहावर होत आहे. खेदाची बाब म्हणजे पावसाळी दिवसातही ओढ्या-नाल्यात खड्डे खोदून त्यातील पाणी भरून आणावे लागते किंवा छताच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन  गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे.ऑक्टोबर महिन्यापासूनच येथील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिसरातील कूपनलिका व  विहिरीही कोरड्या पडत असल्याने येथील महिलांना  एक-दोन किलोमीटरवर असलेल्या बांगरवाडी, चाफेवाडी येथील नदी-नाल्यातून  पाणी आणावे लागत आहे. याबाबतीत ग्रामस्थांनी वारंवार शासनदरबारी पाणीटंचाईमुक्तीसाठी निवेदने दिले आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून आजतागायत कोणत्याही प्रकारची दखल  घेतली जात नसल्याने पाणीटंचाई समस्या कायम असल्याची  येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
 

Web Title: Wandering for water even today in the rural areas of Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.